चला संस्कृत शिकूं या ! पाठ ६

चला संस्कृत शिकूं या !
पाठ ६

हया आधीच्या पाठामध्ये दिलेल्या शब्दसंग्रहातील शब्द सुचवलेल्या क्रमाने लिहून सुभाषित जुळवायचे अशी पद्धत होती. ह्या पाठापासून सुभाषित समजून घ्यायचं तर त्यातल्या शब्दाशब्दाचा अर्थ समजून घेऊनही कसं जमेल, तें पहावं, असा विचार आहे. पाहूं कसं जमेल तें. सुभाषित आहे –

अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ।

शब्दाशब्दाचा अर्थ समजून घ्यायचा, तरी त्याला सुद्धा कांही पद्धत असावीच लागेल. संस्कृतमधे, शब्दांचे संधि असतात, समास असतात. त्यामुळं संधिविच्छेद आणि समासविग्रह केल्यानंतरच शब्दापर्यंत पोचतां येतं. म्हणून पद्धत म्हणजे हीच कीं आधी संधिविच्छेद करायचे. हेंच सुभाषित संधि विच्छेद करून लिहायचं, म्हटलं कीं असं होईल.

अयं निजः परः वा इति गणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानाम् तु वसुधा एव कुटुम्बकम् ॥

अयं  = हा
निजः = आपला
परः = दुसरा
वा = किंवा, अथवा
इति = असे
गणना = म्हणणे
लघुचेतसाम् =  हा समास आहे. यात लघु आणि चेतस् ही दोन पदे आहेत.

लघु = लहान
चेतस् = मन, विचार, बुद्धि
लघुचेतस् = लहान आहे मन ज्याचे असा. हा बहुव्रीहि समास. संस्कृतमधे लघु चेतः यस्य सः
लघुचेतसाम् = लघुचेतस् ह्या शब्दाचे पुल्लिंगी षष्ठी बहुवचन म्हणून अर्थ “लहान मनाच्या लोकांचा”


उदारचरितानाम् = हा देखील समास आहे. इथे उदारम् आणि चरितम् ही पदे आहेत. यस्य सः –> ते –> तेषां –>

उदारम् = उदार
चरितम् = चरित्र, जीवन, विचार
उदारचरित = उदार आहेत विचार ज्याचे, असा. हा देखील बहुव्रीहि समास. संस्कृतमधे, “उदारम् चरितम् यस्य सः”
उदारचरितानाम् = उदारचरित ह्या शब्दाचे पुल्लिंगी षष्ठी बहुवचन म्हणून अर्थ “उदार विचारांच्या लोकांचे”

तु = मात्र
वसुधा = पृथ्वी

वसुधा ह्या शब्दामधे सुद्धा दोन पदे आहेत – वसु आणि धा. “धा” हें सम्पूर्ण पद नाहीं, उपपद आहे. तरी पण त्यालाही अर्थ आहे. उपपदाच्या अर्थासकट वसुधा सारख्या शब्दांचा अर्थ सूत्राच्या पद्धतीनं मांडतात. जसं “वसुभि: धार्यते अतः वसुधा” म्हणजे, वसू जिची धारणा करतात, ती. साहजिकच विचार येतो, हे वसू कोण ? सूत्रांची हीच गंमत आहे. सूत्र म्हणजे सूत, धागा. सूत मिळालं कीं स्वर्ग गांठायची प्रेरणा होतेच. आपण सूत्रसंचालन म्हणतो. सूत्रानं अशी चालना मिळतच असते. असो.


वसू म्हणजे अष्टवसु. आठ दिशांचे दिक्पाल. महाभारतातले भीष्मपितामह हेही वसूच. महाभारताचा सारांश मी अभंगवृत्तात जुळवायचा पण उपद्व्याप केलेला आहे. त्यात वसूंची ती कहाणी अशी आहे –

राजा जन्मेजया । तुझा हा वारसा । कुरुकुळाचा बा । लौकिकाचा ॥
चांद्रवंशी राजे । भरतादि यांचा । शतकोत्तरी हा । इतिहास ॥
आरंभ करीतो । राजा प्रतीपाच्या । कारकीर्दीहूनी । तेच बरे ॥
राजा प्रतीपाचे । वय खूप झाले । तरी वंशदीप । नव्हताच ॥
तपाचरणाचा । निश्चय करूनी । गंगेचे किनारी । राजा गेला ॥
स्वर्गात तेवेळी । स्वतः ब्रम्हदेव । यांचे प्रवचन । चालूं होते ॥
प्रतीपाआधीचा । राजा महाभीष । श्रोतृवृंदामध्ये । बसलेला ॥
अचानक त्याचे । लक्ष गंगेकडे । गेले झाले चित्त । विचलित ॥
ढळला तो आत्मा । शिरला प्रतीप । राजाच्या राणीच्या । गर्भामध्ये ॥
प्रतीपाचा पुत्र । शंतनू जन्मला । राजास जाहले । समाधान ॥
महाभीषाच्या त्या । आत्म्याचा मागोवा । करीत गंगाही । तिथे आली ॥
प्रतीपास तिने । म्हटले तुझ्या ह्या । मुलावर आहे । जीव माझा ॥
ह्याचे जन्माचेही । खूप काळ आधी । ऋणानुबंध तो । जडलेला ॥
कांही वर्षानी मी । परत येईन । ऋणानुबंधास । उजळाया ॥
धरेस येण्याचा । गंगेचा तो बेत । अष्टवसूना कीं । समजला ॥
त्यानाही धरेस । येणे भाग होते । प्रमाद काहीसा । झाला होता ॥
गंगेकडे आले । सारे अष्टवसू । मदत मागण्या । तिची कांही ॥
उषःकालचा जो । संधिवसु त्याचे । नांव की प्रभास । आहे त्याने ॥
कारण गंगेस । सांगताना सारी । पूर्वपीठिकाही । निवेदिली ॥
त्याच्या पत्नीची ना । एक सखी होती । पृथ्वीतलावरी । जिवलग ॥
स्वर्गलोकातील । गाय सुरभीच्या । दुधाची महती । गप्पांमधें ॥
सुरभी येईल । पृथ्वीतळी काय । आग्रह सखीने । खूप केला ॥
आम्ही अष्टवसू । सुरभीचे संगे । तेव्हां गेलो होतो । पृथ्वीवरी ॥
स्वर्ग सोडूनीया । आम्ही गुप्तपणे । जरी पृथ्वीवरी । गेलो खरे ॥
गुरु वसिष्ठानी । मन सामर्थ्याने । जाणूनी आम्हास । शाप दिला ॥
पृथ्वीवरी तुम्हा । जन्म घेणे प्राप्त । तेंच प्रमादाचें । प्रायश्चित्त ॥
अष्टवसू आम्ही । इंद्राचे सेवक । स्वर्ग सोडला तो । प्रमादचि ॥
वसिष्ठांचा शाप । नाहीच टळेल । पुन्हा आम्हा मुक्ति । केव्हा ठावे ॥
अष्टवसूंची ती । व्यथा समजून । गंगेने दिधले । आश्वासन ॥
पृथ्वीतलावर । असताना तुम्हां । जन्म मी देईन । मुक्ती सुद्धा ॥
प्रतीपानंतर । राजमुकुट तो । शंतनूचे शिरी । विराजला ॥
गंगेच्या किनारी । रपेट करतां । नजरेस आली । रूपवती ॥
शंतनूने तिला । मागणी घातली । तिने परि अट । सांगितली ॥
मी कोण सवाल । नाही करायचा । नाही विचारावी । माझी कृत्ये ॥
अट ही मोडाल । त्याक्षणी तुम्हास । सोडावे लागेल । मज पहा ॥
शंतनू दीवाना । अट मानूनीया । केली त्याने तिज । पट्टराणी ॥
तीच गंगा होती । दरवर्षी एका । वसूस दिधला । जन्म तिने ॥
जन्मल्या मुलाला । गंगेत सोडावे । ऐसा घाट तिने । चालवीला ॥
सात वर्षाअंती । सप्तवसू ऐसे । तिने केले मुक्त । निश्चयाने ॥
राजपुत्र ऐसे । गंगार्पण होतां । शंतनू मुकाट । दृश्य पाहे ॥
आठव्याचे वेळी । नाही राहवले । शंतनूने तिज । प्रश्न केला ॥
उत्तर न देता । गंगा गंगेमध्ये । विलीन जाहली । क्षणैकात ॥
तान्हुला घेऊनी । शंतनू महाली । परतला त्याचे । नांव भीष्म ॥

महाभारतात आठी वसूंची नांवें सांगणारा श्लोक असा आहे –

धरो धृवश्च सोमश्च अहश्च अनिलोऽनलः ।
प्रत्यूषश्च प्रभासश्च वसवः अष्टौ प्रकीर्तिताः ॥

गीतेच्या दहाव्या अध्यायात “वसूनां पावकश्चास्मि” असा उल्लेख आहे. पावक म्हणजे अग्नि. अग्नीची दिशा आग्नेय.

वसुधा ह्या शब्दाबद्दल माझे स्नेही श्री. प्रकाश कुलकर्णी ह्यांनी सांगितलं कीं, वसुधा ह्या शब्दाचं सूत्र “वसुभिः धार्यते अतः” असं न घेतां “वसून् धारयति अतः वसुधा” असं पण मानतात. आणि असं सूत्र घेताना, वसु ह्या शब्दाचा दुसरा अर्थ, वसु म्हणजे धन, हा घेतात. “(निरनिराळ्या प्रकारचे) धन धारण करते, ती वसुधा”. हाही अर्थ मोहक आहे ना ? असो.

एव = च
कुटुम्बकम् = कुटुंब

सुभाषिताचा एकूण अर्थ असा होतो –
हा आपला, किंवा हा दुसरा (परका) असा विचार लहान मनाच्या लोकांचा असतो. उदार मनाच्या लोकाना तर सगळी पृथ्वीच एक कुटुम्ब.

हें सुभाषित खरं तर, भारताच्या आंतर्राष्ट्रीय धोरणाचं द्योतक आहे किंबहुना असायला हवं. असा विचार मी मांडला. तेव्हां श्री. कुलकर्णीनी अशी पण माहिती पुरवली कीं, वसुधैव कुटुम्बकम् हे शब्द आपल्या पार्लमेंटच्या प्रवेशद्वारावर कोरलेले आहेत !

आपणा भारतीयांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे तर हें सुभाषित ! चला, पाठ करायचं ना ?

अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ॥

पाठ संपविण्यापूर्वी थोडा स्वाध्याय ?
(१) ह्या सहा पाठात मिळून ब-याच शब्दांची ओळख झाली. या सर्व शब्दांमधे कितीतरी शब्द असे आहेत, कीं ते नेहमी जसेच्या तसेच राहतात. जसे पहिल्या पाठात आलेले “एव” आणि “च”. अशा बदल न होणा-या शब्दाना अव्यय म्हणतात. ही अव्यये क्रियाविशेषणे, संबंधसूचक, उद्गारवाचक अशी असतात. अशा सर्व अव्ययांचीच स्वतंत्र जंत्री बनवली तर एक वेगळ्या प्रकारचा शब्दकोश तयार होईल. पहा बरं, बनवून.

(२) मग इतर शब्द म्हणजे नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे. यांच्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या जंत्र्या बनवायच्या !

शुभमस्तु ।
-o-O-o-

One thought on “चला संस्कृत शिकूं या ! पाठ ६

  1. मा. अभ्यंकर गुरुजी,
    पाठ क्रमांक ४, ५ व ६ अतिसुंदर आहेत.
    मनःपूर्वक धन्यवाद

Leave a comment