ॐ सह नाववतु

एकेका श्लोकाचा अभ्यास करत संस्कृत शिकायचं, या पद्धतीत इथे श्लोक म्हणून आपल्या परिचयाचा शांतिमंत्र निवडलाय, 

ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यं करवावहै । तेजस्वि नावधीतमस्तु । मा विद्विषावहै ।

॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

हा शान्तिमन्त्र कृष्णयजुर्वेदातील आहे. विनोबांच्या अष्टादशीतील कठ, तैत्तिरीय, नारायण, कैवल्य व ब्रह्मबिन्दु उपनिषदांबरोबर म्हणावयाचा आहे. तसं तर हा मंत्र या उपनिषदांबरोबरच म्हणायचा असंही नाही. स्वतंत्रपणे सुद्धा हा मंत्र खूपच अर्थगर्भित आहे. आणि हें असल्यामुळें कीं काय, हा स्वतंत्रपणें म्हटलाही जातो.  नेहमीच्या पद्धतीनं अभ्यास सुरूं करूं या. 

 

(१) सन्धिविच्छेदैः ⇒ ॐ सह नौ अवतु | सह नौ भुनक्तु | सह वीर्यं करवावहै | तेजस्वि नौ अधीतम् अस्तु | मा विद्विषावहै ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

  • तेजस्वि नावधीतमस्तु हा भाग लिहिताना तेजस्विनावधीतमस्तु असा देखील लिहिला जाऊं शकतो. आणि मग त्याचा संधिविच्छेद तेजस्विनौ अधीतम् अस्तु असा होऊं शकतो. तो तसा केल्यास तेजस्विनौ या शब्दाचे विश्लेषण तेजस्विन् या विशेषणात्मक प्रातिपदिकाचे पुँल्लिङ्गी, प्रथमा द्विवचन, किंवा द्वितीया द्विवचन असें होईल.
    • प्रथमा द्विवचन धरले तर, प्रथमा विभक्ति म्हणून कर्तृपद. परंतु तसे द्विवचनी कर्तृपद अस्तु या एकवचनी क्रियापदाशी विसंगत होते.
    • द्वितीया द्विवचन धरले तरी, अस्तु हें क्रियापद अकर्मक असल्याने, द्वितीया विभक्ति देखील विसंगत ठरते.
    • त्यामुळे तेजस्विनावधीतमस्तु असें, जोडून, एकच शब्द म्हणून लिहिणें चुकीचे ठरतें.
    • म्हणताना देखील तेजस्वि असा स्वतन्त्र, न जोडलेला उच्चार झाला पाहिजे.

(२) शब्दाभ्यासाः – शब्द संस्कृत असल्याने त्यांचे व्याकरण संस्कृतमधेच मांडलेले बरें असा विचार मनाशी धरून बहुतेक ठिकाणी शब्दाभ्यास संस्कृतमधेच मांडले आहेत. 

(२’१) ॐ

  • ॐ-ला प्रणव असंही म्हणतात. प्रणव म्हणजे प्र-नव प्रकर्षाने नवीन. ॐकाराचा उच्चार कधीच एकसारखा होत नाही. उच्चार करताना जो श्वासोच्छवास चालू असतो, तोच कधीच एकसारखा असत नाही. आपण स्वतः देखील क्षणाक्षणाला बदलत असतो, जसें कि आपली नखे. ती वाढतच असतात. मुद्दा इतकाच कि, प्रणव म्हणजे प्र-नव प्रकर्षाने नवीन.
  • गीतेतील (८’१३) या श्लोकात ॐ-चा एकाक्षर ब्रह्म असा उल्लेख केला आहे.
  • ॐकार मंगल असतो. त्यामुळे कार्यारंभी त्याचा उच्चार करावा. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची सुरवात ॐ नमोजी आज्ञा अशी ॐकारानेच केली आहे. ॐकार मंगल कां समजायचा, त्याचं कारण एका श्लोकात असं सांगितलंय ॐकारश्चाथशब्दश्च द्वावेतौ ब्रह्मणः पुरा । कण्ठं भित्चा विनिर्यातौ तस्मान्माङ्गलिकावुभौ ।। ॐकार आणि अथ हे दोन्ही शब्द ब्रह्मदेवांनी उच्चार करण्याची देखील वाट पाहूं शकले नाहीत. सरळ त्याच्या कंठाचा भेद करून बाहेर पडले. ब्रह्माच्या कंठातून बाहेर पडले म्हणून दोन्हीही मांगलिक.
  • ज्ञानेश्वरांनी अकार चरणयुगुल । उकार उदर विशाळ । मकार महामंडळ । मस्तकाकार ।। असे ॐकारातील अ, उ, म हे तीन्ही वर्ण सांगताना गणेशाची मूर्ती देखील दाखवली.अकार चरणयुगुल
  • आपटयांच्या शब्दकोशात ॐ-चे वेगवेगळे अर्थ दिले आहेत ⇒
    • सन्मानपूर्वक होकार (ओमित्युच्यताममात्यः ( माल. 6); ओमित्युक्तवतो$थ शार्ङ्गिण इति (1.75; द्वितीयश्चेदोमिति ब्रूमः S. D.1;
    • आज्ञा
    • मंगलमय
    • आर्तीनाशन
    • ब्रह्मन् ⇒ उपनिषदांमध्ये याचा ध्यानधारणेचे एकाक्षर असाही उल्लेख आहे. मांडूक्य उपनिषदात याला भूत, वर्तमान आणि भविष्याचे द्योतक म्हटले आहे.
    • वर्णविश्लेषणाने यात अ म्हणजे वैश्वानर, जागृतीतील आत्मावस्था, उ म्हणजे तेजस्, स्वप्नील आत्मावस्था आणि म् म्हणजे प्रज्ञा, सुषुप्तीतील आत्मावस्था
      • अ म्हणजे विष्णू, उ म्हणजे शिव आणि म् म्हणजे ब्रह्मा, मिळून ॐ म्हणजे त्रिमूर्ति. पहा – अकारो विष्णुरुद्दिष्ट उकारस्तु महेश्वरः । मकारेणोच्यते ब्रह्मा प्रणवेन त्रयो मताः ॥
    • ओंकार म्हणजे ॐ हा उच्चार. पहा – त्रिमात्रमोकारं त्रिमात्रमोंकारं वा विदधति Mbh.VIII.2.89.
      • ओंकार म्हणजे प्राणायामाचे साधन. पहा – प्राणायामैस्त्रिभिः पूतस्तत ओंकारमर्हति Ms.2.75.
      • अलंकारिकरीत्या ओंकार म्हणजे आरंभ. पहा – एष तावदोंकारः Mv.1; B. R.3.78.
      • ओंकारा (स्त्री.) म्हणजे दैवी शक्ति
    • ॐ-चा एकच एक, तरीही सर्वंकष असा अर्थ देता येत नाही. तो अनुभवायचा विषय आहे, विशेषतः ॐ-कार-ध्यानाने. ते अनुभव लाभदायक आणि कल्याणकारक असतात.

(२’२) सह

  • सह अव्यय, जोडीने, बरोबरीने, उदा. – शशिना सह याति कौमुदी सह मेघेन तडित् प्रलीयते (कुमारसंभव 4.33).
  • एकाच वेळी, उदा. – अस्तोदयौ सहैवासौ कुरुते नृपतिर्द्विषाम् (सुभाषित).
  • सह हा शब्द साकल्य, सादृश्य, यौगपद्य, विद्यमानत्व, समृद्धि, संबन्ध आणि सामर्थ्य अशा वेगवेगळ्या अर्थाच्या छटांनी वापरलेला दिसतो.

(२’३) नौ ⇒ अस्मद्-सर्वनामाची द्विवचनी, द्वितीया, चतुर्थी आणि षष्ठी विभक्तीतील पर्यायी रूपें

  • द्वितीया विभक्तीत – आवाम् / नौ
  • चतुर्थी विभक्तीत – आवाभ्याम् / नौ
  • षष्ठी विभक्तीत – आवयोः / नौ  

(२’४) अवतु ⇒ अव्-इति धातुः | अवतु हे रूप – लोटि (आज्ञार्थे) प्रथमपुरुषे एकवचनम् | धातुपाठात या धातूचे वेगवेगळे अर्थ असे दिले आहेत ⇒ अवँ रक्षण-गति-कान्ति-प्रीति-तृप्त्यवगम(तृप्ति-अवगम)-प्रवेश-श्रवण-स्वाम्यर्थ(स्वामी-अर्थ)-याचन-क्रियेच्छा(क्रिया-इच्छा)-दीप्त्यवाप्त्यालिङ्गन(दीप्ति-अवाप्ति-आलिङ्गन)-हिंसा-दान-भाग-वृ॒द्धिषु. आपटयांच्या शब्दकोशात ⇒

  • अव् 1 P. [अवति, आव, आवीत्, अविष्यति, अवितुम्, अवित or ऊत] 1 रक्षण करणें; सह नाववतु Tait 2.1.1. यमवतामवतां च धुरि स्थितः (रघुवंश. ९’१); प्रत्यक्षाभिः प्रपन्नस्तनुभिरवतु वस्ताभिरष्टाभिरीशः Ś.1.1. -2 सुख, समाधान देणें; भले करणें; विक्रमसेन मामवति नाजिते त्वयि (रघुवंश ११’७५); न मामवति सद्वीपा रत्नसूरपि मेदिनी. (रघुवंश १’६५) -3 आवडणे, इच्छा करणे; -4 कृपा करणे; (धातुपाठात आणखी बरेच अर्थ दिले आहेत, जसे गति, कान्ति, अवगम, प्रवेश, श्रवण, स्वाम्यर्थ / सामर्थ्य, याचन, क्रिया, दीप्ति, अवाप्ति, ग्रहण, व्याप्ति, आलिङ्गन, हिंसा, आदान, दहन, भाव, भाग, वृद्धि).
    • प्रयॊ. ग्राह घेणें
    • अनु या उपसर्गाने प्रोत्साहन देणें, प्रेरित करणें
    • उद् या उपसर्गाने 1 लक्ष देणें -2 प्रतीक्षा करणें -3 पुरःसरण करणें
    • उप या उपसर्गाने 1 दोस्ती करणें -2 प्रोत्साहन देणें.
    • सम् या उपसर्गाने 1 समाधान करणें -2 राखणें, रक्षण करणें  
    • लॅटिन भाषेत aveo असा धातु आहे.

(२’५) भुनक्तु ⇒ भुज् इति धातुः |

  • भुज् I. ६ प. (भुजति, भुग्न) 1 वाकवणें -2 बांक देणें, वेडेवाकडे करणें -II. ७ उ. (भुनक्ति-भुङ्क्ते, भुक्त) 1 खाणें, खाऊन टाकणें (आ.); शयनस्थो न भुञ्जीत (मनु. 4.74;3.146; Bk. 14.92); हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् (गीता 2.5) -2 उपभोग घेणें, मालमत्ता असणें; संप्रीत्या भुज्यमानानि न नश्यन्ति कदाचन (मनु.8.146;याज्ञ. 2.24) -3 शरीरसुख उपभोगणे (आ.); सदयं बुभुजे महाभुजः (रघु.8.7; 4.7;15.1;18.4); सुरूपं वा कुरूपं वा पुमानित्येव भुञ्जते (मनु. 9.14) -4 शासन चालवणे, (प्रजेचे) पालन करणें (परस्मै.); राज्यं न्यासमिवाभुनक् (रघु.12.18); एकः कृत्स्नां (धरित्रीं) नगरपरिघप्रांशुबाहुर्भुनक्ति (शिशु. 2.16) -5 अनुभवणे, भोग भोगणें (वृद्धो नरो दुःखशतानि भुङ्क्ते Sk.) -6 (आयुष्य) व्यतीत करणें -7 (खगोलशास्त्रात) संक्रमण करणें
  • अत्र रुधादिः (सप्तमगणीयः) परस्मैपदी च | तस्य लोटि (आज्ञार्थे) प्रथमपुरुषे एकवचनम् |

(२’६) वीर्यम् ⇒ वीर्यम् [वीर्-यत्, वीरस्य भावो यत् वा] 1 शौर्य; वीर्यावदानेषु कृतावमर्षः (किराता. 3.43; (रघु. 2.4, 3.62;11.72); -2 जोश, ताकत -3 पौरुष; वीर्यशौर्याभ्यां च पिता ऋषभ इतीदं नाम चकार (भागवत 5.4.2) -4 शक्ति, निश्चय, धैर्य; -5 सामर्थ्य; जाने तपसो वीर्यम् (शिशु. 3.2) -6 (औषधाचा) गुण; अतिवीर्यवतीव भेषजे बहुरल्पीयसि दृश्यते गुणः (किराता. 2.4); (कुमार. 2. 48) -7 (पुरुषांचे लैंगिक) वीर्य; अमी हि वीर्यप्रभवं भवस्य (कुमार. ३.१५); वसोर्वीर्योत्पन्नामभजत मुनिर्मत्स्यतनयाम् Pt.4.5. -8 तेज -9 (वनस्पतींचे) बीज -10 सोनें (हिरण्य); अन्नं वीर्यं ग्रहीतव्यं प्रेतकर्मण्यपातिते (महाभारत 12.165.39)

  • “वीर्-यत्” या व्युत्पत्तीवरून लक्षात येते कि इथे वीर् (वि + ईर्) हा धातु आहे. पैकी ईर् 2 Ā. (इर्ते, ईराञ्चक्रे, ऐरिष्ट, ईरितुम्, ईर्ण); आणि 1 P. (p. p. ईरित) 1 चाल करणें, हालवून टाकणें -2 स्फुरणें -3 आवाज चढविणें -१० उ. किंवा प्रयॊ. (ईरयति, ईरित) 1 प्रेरणा देणें, प्रेरित करणें (प्रेरणा हा शब्द देखील प्रेर् (प्र + ईर्) या धातूपासून आहे) भडकवणे; ऐरिरच्च महाद्रुमम् Bk.15.52; R.15.2. क्षेमंकरे$र्थे मुहुरीर्यमाणः Bk.12.6. इतीरयन्तीव तया निरैक्षि N.14.21; Śi.9.69; Ki.1.26; R.9.8; निबोध चेमां गिरमीरितां मया, वातेरितपल्लवाङ्गुलिभिः (शिशु. 1); अपरागसमीरणेरितः (किराता. 2.5); Śi.8.2. -2 खेचणें, आकर्षित करणें; उद्धतैरिव परस्परसङ्गादीरितान्युभयतः कुचकुम्भैः (शिशु. 1.32)

(२’७) करवावहै ⇒ इथे कृ हा धातु आहे. धातुपाठात (1) कृञ् करणे । भ्वा. १ उ. (2) कृञ् हिंसायाम् । स्वा. ५ उ. (3) डुकृञ् करणे । त. ८ उ. असा तीन गणांत दिला आहे.

  • “रूपचन्द्रिका” या पुस्तिकेत (संकलक श्री. ब्रह्मानन्द त्रिपाठी, चौखंबा सुरभारती प्रकाशन, वाराणसी) करवावहै हें रूप “कृ-धातुः (तनादिः आत्मनेपदी) । तस्य लोटि उत्तमपुरुषे द्विवचनम्” असें आहे.
  • अर्थातच कर्तृपदम् आवाम् (आम्ही दोघे).

(२’८) तेजस्वि ⇒ तेजस्विन् इति विशेषणम् । अत्र नपुंसकलिङ्गि । तस्य प्रथमा विभक्तिः एकवचनं च ।

  • तेजस्विन् a. (-नी f.) 1 तेज असलेले -2 सामर्थ्यवान; न तेजस्तेजस्वी प्रसृतमपरेषां विषहते (उत्तर. 6.14); -3 आदरणीय -4 कीर्तिवंत -5 उत्तेजित; (बृहदा. S.11.2)
  • तेजस् n. [तिज्-भावे करुणादै असुन्] 1 तीक्ष्णपणा -2 धार -3 स्फुल्लिंग -4 दाह -5 तेज; दिनान्ते निहितं तेजः (रघु. 4.1); तेजश्चास्मि विभावसौ (गीता 7.9) -6 पंचमहाभूतापैकी एक (पृथिवी, अप्, वायु व आकाश ही इतर चार). -7 कुणाच्या कांतीचा उजाळा; अरिष्टशय्यां परितो विसारिणा सुजन्मनस्तस्य निजेन तेजसा (रघु. 3.15) -8 ऊर्जेची आग; शतप्रधानेषु तपोधनेषु गूढं हि दाहात्मकमस्ति तेजः (शिशु. 2.7); -9 सामर्थ्य, शक्ती, धैर्य, शौर्य, वीरतेचे तेज; तेजस्तेजसि शाम्यतु U. 5.7; Ś.7.15. -10 शौर्याचे तेज असलेला; तेजसां हि न वयः समीक्ष्यते R.11.1; (पंचतंत्र 1.328;3.33) -11 ऊर्जा -12 गुणीपणा, अन्याय सहन न करण्याची वृत्ति -13 इभ्रत; तेजोविशेषानुमितां (राजलक्ष्मीं) दधानः (रघु. 2.7) -14 वैर्य, बीज; स्याद्रक्षणीयं यदि मे न तेजः (रघु. 14.65; 2.75); दुष्यन्तेनाहितं तेजो दधानां भूतये भुवः (शिशु. 4.3) -15 कुणाचीही/कशाचीही मूळ वृत्ति/प्रवृत्ति -16 सार, सारसर्वस्व -17 आध्यात्मिक, नैतिक, जादुई शक्ती -18 आग; यज्ञसेनस्य दुहिता तेज एव तु केवलम् (महाभारत 3.239.9) -19 हाडातील सत्त्व -20 पित्त -21 घोड्याचा वेग -22 ताजे लोणी -23 सोने -24 दृष्टीचा स्पष्टपणा -25 तळपणारा देह/वस्तू; ऋते कृशानोर्न हि मन्त्रपूतमर्हन्ति तेजांस्यपराणि हव्यम् (कुमारसंभव 1.51); (शिशु. 4.2) -26 (पित्ताचा) खवळण्याचा गन -27 मेंदू -28 जोश -29 उतावीळपणा -30 राग, क्रोध; मित्रैः सह विरोधं च प्राप्नुते तेजसा वृतः Md.3.28.18. -31 सूर्य; उपप्लवांस्तथा घोरान् शशिनस्तेजसस्तथा (महाभारत 12.31.36)
  • तिज् I. 1 Ā. (इच्छार्थक – तितिक्षते, तितिक्षित) 1 टिकणे, सहन करणें; तितिक्षमाणस्य परेण निन्दाम् M.1.17; तांस्तितिक्षस्व भारत (गीता 2.14); (मनु. 6.47) -II. १० उ. किंवा प्रयॊ. (तेजयति-ते, तेजित) 1 धारदार करणें, धार लावणें; कुसुमचापमतेजयदंशुभिः (रघु. 9.39) -2 उकसावणे

(२’९) अधीतम् ⇒ (अधि + इ)-धातुः । तस्य क्त-कृदन्तं विशेषणम्  । अत्र नपुंसकलिङ्गि । तस्य प्रथमा विभक्तिः एकवचनं च ।

  • अधीत कभूधावि  शिकलेले, अभ्यासलेले, वाचलेले, पाठ केलेले, उमगलेले, वगैरे  
  • अधी [अधिं-इ] हा धातू. 2 A. 1 अभ्यासणे, शिकणे, पाठ करणें, उमगणे, आकलन होणें, वगैरे; (ज्यांच्याकडून शिकायचे, त्याची पंचमी) अविश्रामं वहेत् भारं शीतोष्णं च न विन्दति । ससन्तोषस्तथा नित्यं त्रीणि शिक्षेत गर्दभात् ; आख्यातोपयोगे (पाणिनि १-४-२९) उपाध्यायादधीते (सिद्धांतकौमुदी); सो$ध्यैष्ट वेदान् Bk.1.2. -2 (परस्मैपदी.) (a) आठवणे, विचार करणें, काळजी करणें; रामस्य दयमानो$सावध्येति तव लक्ष्मणः Bk.8.119;18.38; ममैवाध्येति नृपतिस्तृप्यन्निव जलाञ्जलेः (किराता. 11.74) (b) शिकणे, पाठ करणें; गच्छाधीहि गुरोर्मुखात् (महाभारत) -प्रयोजक [अध्यापयति] शिकविणें; (तौ) साङ्गं च वेदमध्याप्य (रघु. 15.33); विद्यामथैनं विजयां जयां च… अध्यापिपद् गाधिसुतो यथावत् Bk.2.21,7.34; अध्यापितस्योशनसापि नीतिम् (कुमारसंभवम् 3.6).
  • धातुपाठे (1) इण् (अदादिः परस्मैपदी) गतौ (2) इङ् (अदादिः आत्मनेपदी) अध्ययने (नित्यमधिपूर्वः) (3) इक् (अदादिः परस्मैपदी) स्मरणे (अयमप्यधिपूर्वः)

(२’१०) अस्तु ⇒ अस्-धातुः | धातुपाठे अ० सेट् प० । असँ भु॒वि | तस्य लोटि (आज्ञार्थे) प्रथमपुरुषे एकवचनम् |

  • अस् I. 2 P. [अस्ति, आसीत्, अस्तु, स्यात्; या धातूची जी रूपे बनत नाहीत, त्या ठिकाणी भू या धातूची रूपे वापरली जातात. 1 असणें, अस्तित्त्वाची प्रचिती देणें, जगणे; नासदासीन्नो सदासीत् (ऋग्वेद 1.129.1); आत्मा वा इदमेक एवाग्र आसीत् (ऐतरेयोपनिषद 1.1) श्रुतिद्वैधं तु यत्र स्यात् (मनुस्मृति 2.14); शपथे नास्ति पातकम् 8.112; न त्वेवाहं जातु नासम् (गीता 2.12); आसीद्राजा नलो नाम (नलोपाख्यान 1.1); न अस् = नसणे, हरवणे, गायब होणे, संपणे; नायमस्तीति दुःखार्ता (नलोपाख्यान 7.16); अस्ति भोक्तुम् (सिद्धांतकौमुदी – हें खाण्यासाठी आहे); (अस्ति या शब्दाच्या इतर प्रयोगाविषयी “अस्ति” हा शब्द पहावा.). -2 अध्याहृत क्रियापदे बऱ्याचदा या धातूची असतात; भक्तो$सि मे सखा च (गीता 4.3); धार्मिके सति राजनि (मनुस्मृति 11.11); आचार्ये संस्थिते सति (मनुस्मृति 5.8); तसेंच एवमेव स्यात्, तूष्णीमासीत्, वगैरे -3 (कुणाचे) असणें, (कुणापाशी) असणें, (आंग्ल भाषेत अशा अर्थी have हा धातु वापरतात), (संस्कृतमधे ज्याचे किंवा ज्याच्याजवळ, त्याची षष्ठी) यन्ममास्ति हरस्व तत् (पंचतंत्र 4.76); यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा (पंचतंत्र 5.7); न हि तस्यास्ति किंचित् स्वम् (मनुस्मृति 8.417); नास्ति बुद्धिरयुक्तस्य (गीता 2.66). -4 भाग्यवश प्राप्त होणें (ज्याला प्राप्त व्हायचं, त्याची षष्ठी); यदिच्छामि ते तदस्तु (शाकुन्तल 4) तस्य प्रेत्य फलं नास्ति (मनुस्मृति 3.139 त्याला हे मिळूं शकत नाही) -5 स्फुरणें; आसीच्च मम मनसि (कादंबरी 142 “असें मला वाटले” -6 होणें; तां दृष्ट्वा दशविस्तारामासं विंशतियोजनः (रामायण); -7 ठरणें (ज्याविषयी ठरायचं, त्याची चतुर्थी); स स्थाणुः स्थिरभक्तियोगसुलभो निःश्रेयसायास्तु वः V.1.1; संगतं श्रीसरस्वत्योर्भूतये$स्तु सदा सताम् 5.24; अस्-धातू अध्याहृत ठेवून चतुर्थीयुक्त वाक्य; यतस्तौ स्वल्पदुःखाय (पंचतंत्र 1) -8 (अमुकसाठी) पुरे असणें; सा तेषां पावनाय स्यात् (मनु. 11.85); अन्यैर्नृपालैः परिदीयमानं शाकाय वा स्याल्लवणाय वा स्यात् (जगन्नाथ) -9 निवास करणें, राहणें; हा पितः क्वासि हे सुभ्रु Bk.6.11. -10 घडणें -11 (अमुक) संबंध असणें (सप्तमी-प्रयोग); किं नु खलु यथा वयमस्यामेवमियमप्यस्मान् प्रति स्यात् Ś.1. अस्तु = असो, असूं दे; एवमस्तु, तथास्तु = तेंही ठीक.

(२’११) मामा अव्यय नुसत्या नकारापेक्षा, परावृत्त करण्याच्या अर्थाने वापरावयाचे सामान्यतः आज्ञार्थी प्रयोग; मद्वाणि मा कुरु विषादमनादरेण Bv.4.41; (a) अनद्यतन ल-कारात क्रियापदातील अ-चा लोप; क्लैब्यं मास्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते (गीता 2.3); पापे रतिं मा कृथाः Bh.2.77; मा मूमुहत् खलु भवन्तमनन्यजन्मा मा ते मलीमसविकारघना मतिर्भूत् (मालविकाग्निमित्र 1. 32); कधी अ-चा लोप न करता; मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः (रामायण) (b) लुङ्-लकारातही अ-चा लोप करून; मा चैनमभिभाषथाः (रामायण 1.2.15); (c) लृट्-लकारात आणि विध्यर्थात “नाही तर” या अर्थी; लघु एनां परित्रायस्व मा कस्यापि तपस्विनो हस्ते पतिष्यति Ś.2; मा कश्चिन्ममाप्यनर्थो भवेत् (पञ्चतन्त्र 5); मा नाम देव्याः किमप्यनिष्टमुत्पन्नं भवेत् (किराता. 37); विध्यर्था ऐवजी आज्ञार्थ; त्वरतामार्यपुत्र एतां समाश्वासयितुं मास्या विकारो वर्धताम् M.4. (d) शाप देताना शतृ/शानच् कृदन्ताबरोबर; मा जीवन् यः परावज्ञादुःखदग्धो$पि जीवति (शिशु. 2.45); (e) ण्यत्-कृदन्ताबरोबर; मैवं प्रार्थ्यम् क्रियापद किंवा कृदन्त नसतानाही मा जसें “मा तावत्” ‘नको ना’ अशा अर्थी; मा मैवम्; मा नाम रक्षिणः Mk.3 कधी मा-च्या पाठोपाठ स्म घेऊन विशेष वाक्यरचना साधली जाते, जसें क्लैब्यं मा स्म गमः पार्थ (गीता 2.3); मा स्म प्रतीपं गमः (शाकुंतल 4.17); मा स्म सीमन्तिनी काचिज्जनयेत् पुत्रमीदृशम्.

(२’१२) विद्विषावहै ⇒ (वि + द्विष्) इति धातुः | अ० अनिट् उ० । द्वि॒षँ॑ अप्री॑तौ | तस्य लोटि उत्तमपुरुषे द्विवचनम् |

  • द्विष् 2 U. (द्वेष्टि, द्विष्टे; द्विष्ट) द्वेष करणें, तिरस्कार करणें; न द्वेक्षि यज्जनमतस्त्वमजातशुत्रुः Ve.3.15; नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता Bg.2.57;18.1; Bk. 17.61;18.9; रम्यं द्वेष्टि Ś.6.5 (या धातूबरोबर प्र, वि आणि सम् हे उपसर्ग वापरले जातात. त्यांनी अर्थाला बळकटी येते.)

(२’१३) शान्तिः ⇒ शान्ति-इति स्त्रीलिङ्गि नाम | तस्य प्रथमा विभक्तिः एकवचनं च |

  • शान्तिः f. [शम्-क्तिन्] 1 शांत करणें, त्रास घालविणें; अध्वरविघातशान्तये R.11.1,62. -2 शांतता, शांत स्वभाव, कसलाही आवाज नसणे, स्वस्थता, विश्राम, वगैरे; स्मर संस्मृत्य न शान्तिरस्ति मे (कुमारसंभव 4.17); शान्तिः कुतस्तस्य भुजङ्गशत्रोः Māl.6.1; यत् किंचिद् वस्तु संप्राप्य स्वल्पं वा यदि वा बहु । या तुष्टिर्जायते चित्ते सा शान्तिः कथ्यते बुधैः ॥ (पद्मपुराण) -3 तेढ मिटणे; सर्पस्य शान्तिः कुटिलस्य मैत्री विधातृसृष्टौ न हि दृष्टपूर्वा Bv.1.125. -4 तह -5 कसली आर्तता नसणे, भौतिक सुखांच्या बाबतीत उदासीनता; तदुपहितकुटुम्बः शांन्तिमार्गोत्सुको$भूत् (रघु. 7.71). -6 सांत्वना -7 भेद मिटविणें -8 भूक मिटणे -9 संकटनिवारणासाठी करण्याचा विधि; शान्तयश्चापि वर्धन्तां यथाकल्पं यथाविधि (रामायण 1.8.16). -10 शुभशकुन -11 दोषमुक्ती

३ अन्वयाः अनुवादाश्च

(३’१) ॐ

  • विनोबानी दिलेला अर्थ “ॐ (परमात्मा)”

(३’२) नौ (आवाम्) सह अवतु ⇒

  • विनोबानी दिलेला अर्थ “(परमात्मा) आमचे एकत्र रक्षण करो.
  • अवतु या क्रियापदानुरूप कर्तृपद पुंल्लिंगी, स्त्रीलिंगी किंवा नपुंसकलिंगी असूं शकते. मग “नौ सह अवतु” हा समान वाक्यांश घेऊन निरनिराळी वाक्ये खालीलप्रमाणे असूं शकतात.
    • (1) सः ईश्वरः नौ सह अवतु
    • (2) सा देवी नौ सह अवतु
      • “सा देवी” अशा कर्तृपदाने, देवीसूक्तम्-मधील नमने आठवतात, “या देवी सर्वभूतेषू विष्णुमायेति शब्दिता । नमः तस्यै नमः तस्यै नमः तस्यै नमो नमः ॥ या देवी सर्वभूतेषू चेतनेत्यभिधीयते । … या देवी सर्वभूतेषू बुद्धिरूपेण संस्थिता । … या देवी सर्वभूतेषू निद्रारूपेण संस्थिता । … वगैरे
    • (3) तत् परमतत्त्वं नौ सह अवतु (किंवा) तत् ईशतत्त्वं नौ सह अवतु (किंवा) तत् ब्रह्मतत्त्वं नौ सह अवतु
    • (4) हे परमेश्वर भवान् नौ सह अवतु
    • (5) हे देवि, भवती नौ सह अवतु
    • (6) हे परमतत्त्व, भवत् नौ सह अवतु OR हे ईशतत्त्व, भवत् नौ सह अवतु OR हे ब्रह्मतत्त्व, भवत् नौ सह अवतु
    • सह नाववतु याचा अनुवाद बहुशः “आमचे रक्षण करो” असाच केला जातो. तथापि अव् या धातूचे कितीतरी अर्थ आहेत, याचा विचार केल्यास असा अनुवाद योग्य म्हणता येत नाही. संत रामदासांनी करुणाष्टकांमधे जितक्या करुणा भाकल्या आहेत, त्या सगळ्या “सह नाववतु” या एका वाक्यात सामावल्या असं म्हटलं पाहिजे. त्यामुळे “सह नाववतु” म्हणजे “आम्हां दोघांची सदा सर्वदा, सर्व परिस्थितीत, सर्वकाळी काळजी वाहा”.

(३’३) नौ (आवाम्) सह भुनक्तु

  • विनोबानी दिलेला अर्थ “आमचा (गुरु-शिष्यांचा) एकत्र विकास करो.”
  • नौ द्विवचनी आणि केवळ द्वितीया, चतुर्थी, षष्ठी या विभक्तिमधेच असते, भुनक्तु = धातुः भुज् / भुञ्ज् । तस्य लोटि (आज्ञार्थे) प्रथमपुरुषे एकवचनम्, म्हणून धातुः भुज् / भुञ्ज् याचा अर्थ “खाणें, उपभोग घेणें” असा न घेता, “खायला देणें, उपभोगासाठी प्राप्त करून देणें, असा घेतला पाहिजे.
  • शिवाय, जसें अवतु या क्रियापदाच्या बाबतीत (३’२) मधे वेगवेगळ्या कर्तृपदानी वेगवेगळी वाक्ये बनविली, तशी भुनक्तु या क्रियापदाची देखील बनवूं शकतो.
    • (1) सः ईश्वरः नौ सह भुनक्तु
    • (2) सा देवी नौ सह भुनक्तु
    • (3) तत् परमतत्त्वं नौ सह भुनक्तु
    • (4) हे परमेश्वर भवान् नौ सह भुनक्तु
    • (5) हे देवि, भवती नौ सह भुनक्तु
    • (6) हे परमतत्त्व, भवत् नौ सह भुनक्तु OR हे ईशतत्त्व, भवत् नौ सह भुनक्तु OR हे ब्रह्मतत्त्व, भवत् नौ सह भुनक्तु

(३’४) (आवां) वीर्यं सह करवावहै

  • विनोबानी दिलेला अर्थ “आम्ही एकत्र पराक्रम करूं या.”
  • वीर्यम् ⇒ वीर्यम् या शब्दाचा अनुवाद बहुशः वीरता, शौर्य, लढाऊपणा असा केला जातो. तथापि वीर्यम् म्हणजे पूर्ण मन लावून केलेले कोणतेही काम, असा सर्वंकष अर्थ जास्त समर्पक म्हणता येईल ना ? त्या ओघाने, (आवां) वीर्यं सह करवावहै याचा अर्थ “आपण सारी कामे जोडीने, मिळून, मनःपूर्वक करूं या.” असं म्हटलं कि हें वाक्य म्हणजे दोघांनी मिळून घ्यायची शपथ आहे. हें वाक्यच काय, सगळा मंत्रच दोघांनी मिळून अर्थपूर्णपणे सर्व ज्येष्ठ-श्रेष्ठ-आप्तेष्टांच्या साक्षीने म्हणायचा, तोच विवाह !
  • दोघांनी मिळून अशी शपथ घ्यायची, याचा असाही अर्थ होतो, कि, आपण दोघे कोणत्याही कारणांनी आपल्यात वितुष्ट येऊं देणार नाही. वितुष्ट आलं कि संपलं, मग कुठलंच काम मिळून होणार नाही. सह याचा अर्थ वितुष्टरहित ! “सह” या शब्दाचा असा अर्थ कुठल्या शब्दकोशात मिळणार नाही, कदाचित. पण मंत्राचं मनन केलं तर पटणारा आहे ना अर्थ ? वितुष्ट हा शब्द देखील विचार करण्यासारखा आहे. “तुष्टी संपवते, तें वितुष्ट !”
  • कांही मतभेद आलेच तर आपण ते समन्वयानं मिटवू.  
  • अशा सटीक अर्थानं पाहिलं, तर हा मन्त्र कोणत्याही दोन देशांमधील करारनाम्यांना देखील सात्त्विकतेचा स्पर्श देणारा आहे.

(३’५) तेजस्वि नावधीतमस्तु  

  • विनोबानी दिलेला अर्थ “आमचे अध्ययन तेजस्वी होवो.”
  • माझ्या मते, याचा अन्वय दोन प्रकारे होऊं शकतो.
    • (१) नौ (आवयोः) अधीतं तेजस्वि अस्तु (भवतु) अशा अन्वयाने अर्थ होतो,  “आम्हा दोघांचेही अध्ययन तेजस्वी होवो.” अशा अर्थामधे कांही सूक्ष्म अर्थछटा ध्यानात येतात.
      • दोघा सहाध्यायांमधे स्पर्धात्मक वृत्ति असूं शकते. ती नसावी हा संकेत. अश्वत्थामा आणि अर्जुन दोघेही द्रोणाचार्यांचे शिष्य, एक मुलगा, दुसरा लाडका शिष्य. द्रोणाचार्यांनी देखील दोघेही शिष्य हें भान ठेवायचे.
      • अध्ययन तेजस्वी असायचं, म्हणजे, ३५ टक्के मिळवले कि पास, ही कल्पनाच चूक म्हटली पाहिजे. ब्रिटिशाना ३५ टक्क्यांनी पास होणारे लोकही हवे होते. त्या गरजेसाठी शिक्षणव्यवस्थेत त्यांनी तशी सोय केली.
        • वैद्यकीय क्षेत्रात ३५ टक्क्यांनी पास झालेला डॉक्टर ही किती समाजविघातक गोष्ट आहे !
    • (२) दुसरा अन्वय “(आवाभ्याम्) अधीतं नौ (आवाभ्याम्) तेजस्वि अस्तु (भवतु)” असा केला कि त्याचा अर्थ होतो, “आपले (आपल्या दोघांचे) अध्ययन आपणासाठी (आपणां दोघांसाठी) तेजस्वी असूं दे.” एक मुलगी आणि तिचा नवरा दोघेही डॉक्टर आहेत. दोघांनीही जनरल सर्जरीमधे M. S. केलं. पुढे मात्र मुलगी रेडिओलॉजिस्ट आणि नवरा विशिष्ट विषयाचा सर्जन अशी विशेष शिक्षणाची दिशा ठरवली, जी त्यांच्या सहजीवनाला समर्पक दिसते. “आपले (आपल्या दोघांचे) अध्ययन आपणासाठी (आपणां दोघांसाठी) तेजस्वी असूं दे.” असा व्यवस्थित, सहजीवनाला समर्पक अर्थ सिद्ध केला.
    • शिक्षणव्यवस्था, समाजव्यवस्था, कौटुंबिक अर्थव्यवस्था, दोघा सहाध्यायांमधे असावं, असं परस्पर सामंजस्य, असा सर्वांगीण विचार या एका वाक्यात आहे, असं दिसतं.
    • आपण शिकतो, आपलं अध्ययन होतं, याबद्दल एक छान सुभाषित आहे, आचार्यात् पादमादत्ते पादं शिष्यः स्वमेधया । पादं सब्रह्मचारिभ्यः पादं कालक्रमेण च ।। शाळेत, गुरुजनांकडून आपण शिकतो, तें पाद म्हणजे एक चतुर्थांश, २५ टक्के इतकंच समजावं. जें शिकलो, त्यावर स्वतःचं मनन, चिंतन, अभ्यास असावा. तो दुसरा चतुर्थांश. मित्रांबरोबर, सहाध्यायांबरोबर जरूर देवाणघेवाण, चर्चा असावी. त्याने आणखी एक चतुर्थांश. बाकीचं जीवनात येणाऱ्या अनुभवातून होत राहतं, तें पचवायचं, रिचवायचं, शहाणं होत राहायचं, आयुष्यभर. त्यात देखील जीवनसाथीची साथ असली पाहिजे. तें दोघांचं मिळून जीवनशिक्षण असतं. तेंही तेजस्वी असावं. दोघेही सहाध्यायीच असतात.
    • दोन सहाध्यायांमधे बऱ्याचदा स्पर्धा, आणि त्यातून वाढणारी ईर्षा दिसते. माझा अभ्यास कसा किती होईल, यापेक्षा दुसऱ्याचा अभ्यास बिघडला कि तो स्पर्धक राहणार नाही, असा विचारच नव्हे, तर खटाटोपही पाहायला मिळतो. ३ ईडियट्स पिक्चरमधे चतुर रामलिंगमची तशी वृत्ति दाखवली आहे.
    • खरं तर शिकवत असताना शिक्षकाचं देखील शिक्षण घडत असतं, निरनिराळ्या वृत्ती-प्रवृत्तीची मुले कशी हाताळावी, याचं सुद्धा. “नौ (आवयोः) अधीतं तेजस्वि अस्तु (भवतु)” हा मंत्र शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांबरोबर म्हणावा.
  • या मंत्रात अभ्यासलेला विषय तेजस्वी असूं दे, असं देखील म्हटलं आहे. तर, अभ्यासलेला विषय तेजस्वी असायचा म्हणजे कसा असायचा, याबद्दल देखील वेगवेगळे विचार असूं शकतात.  
    • (१) अभ्यासलेला विषय तेजस्वी असायचा म्हणजे जरूर पडेल तेव्हा तो कामास यावा. अभ्यासलेला विषय तेजस्वी म्हणजे “ready recall” क्षणार्धात उद्धृत करता आला पाहिजे. याबद्दल एक छान सुभाषित आहे, “पुस्तके स्थातु या विद्या परहस्तगतं धनम् । कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद्धनम् ।।” पुस्तकातून शिकलेली विद्या पुस्तकातच राहिली असेल, आपल्या डोक्यात, आपल्या बुद्धीत उतरली नसेल, तर जरूरीच्या वेळी काय पुस्तक शोधात राहणार ? रुग्णासमोर डॉक्टर काय दरवेळी पुस्तक धुंडाळतात ? जी आत्मसात झाली नाही, ती विद्या आपली नव्हेच. “Ready recall” विद्या म्हणजेच तेजस्वि अधीतम्. हल्ली लोकांना, पानवाल्याला सुद्धा कॅल्क्युलेटर लागतो. “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा” !
    • (२) अभ्यासलेला विषय तेजस्वी असायचा म्हणजे तो पुण्यप्रद असावा. लोक साधना करतात आणि त्यांना सिद्धी प्राप्त होतात. नारदमुनींच्या सांगण्यावरून ध्रुवबाळानं तपश्चर्या केली आणि त्याला अढळपद मिळाले. वाल्यानं तपश्चर्या केली, वाल्मिकी झाला.
    • (३) शकुंतलादेवींनी आकड्यांच्या गंमतीजमती इतक्या आत्मसात केल्या, त्यात इतकी तेजस्विता होती, कि लोक थक्क होत. अशा तेजस्वितेमागे अर्थातच खूप परिश्रम असतात.   

(३’६) (आवाम्) मा विद्विषावहै

  • विनोबानी दिलेला अर्थ “आम्ही परस्परांचा द्वेष न करो.”
  • या मंत्रातील “सह वीर्यं करवावहै” आणि “मा विद्विषावहै” ही दोन्ही वाक्ये दोघांनी परस्परांशी कसं वागायचं याविषयी आहेत.
  • तसं तर “सह वीर्यं करवावहै” असं म्हटल्यावर “मा विद्विषावहै” हें वेगळं म्हटलं पाहिजे कां ? पण हे अनुभवाचे बोल असूं शकतात. शौर्य करतांना मिळून केलं तरी खरं श्रेय कुणाचं, यावरून वितुष्ट निर्माण होऊं शकतं. त्यामुळे “सह वीर्यं करवावहै” हें प्रसंग निभावून नेण्यासाठी असूं शकतं. “मा विद्विषावहै” हें मात्र परस्पर संबंध कसे जोपासायचे, याविषयी, म्हणजेच कांहीशा दीर्घकालीन संबंधाविषयी आहेसे समजावे.

(३’७) ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः हा समापनाचा उच्चार प्रत्येक शांतिमंत्राच्या शेवटी आहेच. तरी पण याविषयीचं विवेचन प्रत्येक वेळी मांडावंच.

(४) विमर्शाः / विवेचन  

(४’१) माझ्या मतें हा शान्तिमन्त्र कोणत्याही दोन एककांनी मिळून म्हणावयाचा आहे, जसें “सह नौ भुनक्तु” बद्दल विनोबा “आमचा (गुरु-शिष्यांचा)” असं म्हणतात. पण दोन एकक हे पति-पत्नी, दोन मित्र, वक्ता-श्रोतृवृंद, नेता-अनुयायी, गुरु आणि शिष्यवृन्द किंबहुना कोणतेही दोन पक्ष, दोन पंथ, दोन देश सुद्धा, इतकी दोन एककांची व्याप्ती असूं शकते. अशा व्याप्तीत, दोन्ही एकके एकवचनी, एक एकवचनी व दुसरे बहुवचनी, किंवा दोन्ही बहुवचनी अशी एकके असूं शकतात.

  • लग्नवेदीवरील वधूवरांसाठी हा शांतिमंत्रच विवाहविधी म्हणावा असा आहे. सप्तपदीचा सारा गर्भितार्थ या मंत्रात आहे.
  • दोन देशांच्या उच्चपदस्थानीं केवळ हा मंत्र लिहिलेल्या करारनाम्यावर हस्ताक्षरे करावीत, दोन्ही देशांच्या लोकांचं भलं ज्या कशात आहे, तें सगळं त्यांत आलं.

(४’२) सर्व शान्तिमंत्रांच्या शेवटी ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः असा जो त्रिवार उच्चार असतो, त्याबद्दल देखील विचार करण्याजोगं आहे तें म्हणजे  

  • इथे शान्तिः हा उच्चार तीनदा कां ? साधी गोष्ट आहे, कि “ॐ शान्तिः” असं एकदाच म्हणून पहा. संपर्क ओंगळ वाटतं ना ! शास्त्रीय गायनात सुद्धा समारोपाचे स्वर तीनदा आळवायचे, असा दंडक आहे.
  • उच्चार तीनदा करण्यात वेगवेगळे अर्थ ध्वनित होतात, असें समजायचे कां ? तसं असेल तर ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः याचा अनुवाद काय समजायचा ?
  • शान्तिः या उच्चाराचा सरळ अर्थ हाच कि “शांति असूं दे”. मग विचार हा येतो कि शांती असायला काय असावं लागतं ? मन अतृप्त असेल, तर शांती असणार नाही. त्यामुळे “शांति असूं दे” म्हणजे इच्छा, अपेक्षांची तृप्ति असूं दे. तरी पण, सध्याच्या अपेक्षांची तृप्ति झाली तरी, नवीन अपेक्षा मनात येत राहिल्या, तरी शांति वरचेवर बिघडत राहणार. तर पुन्हा “शांति असूं दे” म्हणायचं, म्हणजे “चित्तीं असो द्यावे समाधान” तशी “शांति असूं दे”. वृत्तीच समाधानी होऊं दे. समाधानी वृत्ती हा स्वभावच बनला, कि मग शांतिच शांति. तर तिसऱ्यांदा “शांति असूं दे” म्हणायचं म्हणजे समाधानी असणं हि वृत्ति बनूं दे, स्वभाव बनूं दे, त्या वृत्तीला स्थिरता येऊं दे.
  • माझे स्नेही श्री. विजय काणे यांनी सुचवलं कि, शांत व्हायचा असतो, तो म्हणजे अग्नि, ताप. ताप तर त्रिताप सांगितले आहेत, आधिदैविक ताप, आधिभौतिक ताप, आध्यात्मिक ताप. तीन वेळां “शांति असूं दे” अशी प्रार्थना करायची, म्हणजे आधिदैविक तापांची शांति असूं दे, आधिभौतिक तापांची शांति असूं दे, आध्यात्मिक तापांची शांति असूं दे.   
  • “शांति असूं दे” म्हणजे आत्मशांती असूं दे, असा आत्म्याशी निगडित आहे, असं समजावं तर, आत्म्याच्या चार अवस्था सांगितल्या आहेत, जागृति, स्वप्नावस्था, सुषुप्ति आणि तुर्यावस्था (तुरीयावस्था). तुरीया म्हणजे चौथी. ती अवस्था योग्याना प्राप्त होऊं शकते. सामान्यांना नाही. भगवंतांनी अर्जुनाला तेंच सांगितलं, “तस्मात् योगी भवार्जुन” (गीता ६’४६). तुरीयावस्थेचा विचार बाजूस ठेवला तरी, जनसामान्य म्हणून आपण, आपला आत्मा जागृति, स्वप्नावस्था, सुषुप्ति या अवस्थांमधे शांत असूं दे, अशी प्रार्थना तरी करावीच ना. आत्मा अस्वस्थ असेल तर झोप सुद्धा शांत लागत नाही, सुषुप्ति साधत नाही.
  • मतलब काय कि ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः या त्रिवार उच्चारात देखील अर्थगर्भिता आहे. तसा भाव, तितकी भक्ती उच्चारात यावी.

शुभमस्तु ।

-o-O-o-

 

Leave a comment