चला, संस्कृत शिकूं या ! – पाठ १० वा

चला, संस्कृत शिकूं या ! – पाठ १० वा
ह्या पाठासाठी मी एक दोन ओळींचा श्लोक घेतोय्. याला सुभाषित म्हणावं, असा आग्रहही मी धरणार नाही. या श्लोकातलं व्याकरण देखील खूपच सोपं आहे. उगाच प्रस्तावना कशाला. श्लोकाकडेच वळूं.
इन्द्रो वायुर्यमश्चैव नैर्ऋतो मध्यमस्तथा ।
ईशानश्च कुबेरश्च अग्निर्वरुण एव च ॥
सन्धिविच्छेद करून श्लोक असा होतो –
इन्द्रः वायुः यमः च एव नैर्ऋतः  मध्यमः तथा ।
ईशानः च कुबेरः च अग्निः वरुणः एव च ॥
शब्दांच्या अभ्यासाकडे वळण्याआधी कांही सहज नजरेस येणा-या गोष्टी पण पहा बरं –
१. एकूण १६ शब्दामधे ७ अव्यये आहेत. त्यातसुद्धा “च” ४ वेळा, “एव” दोन वेळा आणि एक “तथा”. म्हणजे खरे अव्यय शब्द तीनच आहेत.
२. बाकीचे ९ शब्द नामे आहेत.
३. इथे एकही क्रियापद नाही.
४. क्रियापदच नाही, तर इथे काही वाक्य आहे की नाही ?
चला, जें कांही आहे, तें आहे. आपण अभ्यासाकडे वळूं या.
मराठी माणसाला बहुतेक शब्दांचे अर्थ सांगायची पण जरूर नाहीं. पण कांहीं विशेष माहिती कुणालाही आवडेल, नाही कां ?
१. इन्द्रः याला पूर्व दिशेची अधिष्ठात्री देवता, असंही मानतात.
२. वायुः पंचमहाभूतापैकी एक. अष्टवसूंपैकी एक. वायव्य दिशेची अधिष्ठात्री देवता
३. यमः = मृत्युदेवता, सत्य आणि धर्म यांचा प्रणेता. रविपुत्र. शनिदेवाचा धाकटा बंधु. दक्षिणदिशेची अधिष्ठात्री देवता. म्हणून दक्षिणेकडे पाय करून झोपल्यास, आपण यमाचा रोष ओढवून घेतो, असं म्हणतात. पण यामागं शास्त्रीय विचारही आहे, म्हणतात कीं, दक्षिणकडे पाय करून झोपल्याने, पृथ्वीच्या लोहचुंबकीय शक्तीचा आपल्यावर विपरीत परिणाम होतो
४. च = आणि. संबंधसूचक अव्यय
५. एव = च, सुद्धा. अव्यय
६. नैर्ऋतः = अषटवसूंपैकी एक. नैर्ऋत्य दिशेची अधिष्ठात्री देवता
७. मध्यमः = मध्यस्थान
८. तथा = तसेच. अव्यय. जसे-तसे अशा अर्थाने “यथा”च्या जोडीचे
९. ईशानः = शंकराचे नांव. अष्टवसूपैकी सुद्धा एक वसू. ईशान्य दिशेची अधिष्ठात्री देवता. कैलास पर्वत आणि मानस सरोवर, ज्यांना शिवाच्या वास्तव्याची स्थाने मानतात, ती भारताच्या ईशान्येला आहेत, हेंही अर्थपूर्ण आहे.
१०. च  = आणि
११. कुबेरः = धनदेवता. उत्तर दिशेची अधिष्ठात्री देवता
१२. च = आणि
१३. अग्निः = पंचमहाभूतापैकी अग्नितत्त्व. आग्नेय दिशेची अधिष्ठात्री देवता.
१४. वरुणः = पर्जन्यदेवता. पश्चिमदिशेची अधिष्ठात्री देवता.
१५. एव  च, सुद्धा. अव्यय
१६. च = आणि
सर्वच नामे पुल्लिंगी, प्रथमा विभक्ती, एकवचनाची असल्यानं कोष्टक बनवलं नाहीं.
आता जरा गंमत पाहूं. एक ३ x ३ ची चौकट बनवून ज्या दिशेची जी अधिष्ठात्री देवता तिचे नांव तिथे लिहायचे. जोडीला, श्लोकांत तिचा उल्लेख ज्या क्रमाने आला, तो क्रमांक लिहायचा. मग चौकट अशी बनेल.
२ वायुः ७ कुबेरः ६ ईशानः
९ वरुणः ५ मध्यमः १ इन्द्रः
४ नैर्ऋतः ३ यमः ८ अग्निः
आता फक्त संख्यांकडे पहा. चौकटीच्या सर्व उभ्या स्तंभातील आणि आडव्या ओळीतील तसेच दोन्ही कर्णावरील संख्यांच्या बेरजा १५ होतात !
वाः ! हा श्लोक म्हणजे, गणीती ज्याला “जादुई चौरस” म्हणतात त्याचं सूत्रच आहे ! आणि हें सूत्र केवळ १ ते ९ या आंकड्यासाठीच नाहीय्ये. कोणतेही नऊ सलग आंकडे घ्या. कोणती संख्या कुठं मांडायची तें सूत्राप्रमाणं करत जायचं. आपण २६ ते ३४ ह्या संख्या मांडून बघूं.

२७ ३२ ३१
३४ ३० २६
२९ २८ ३३
आता सगळ्या बेरजा ९० होतात. कारण प्रत्येक संख्या १ ते ९ पेक्षा २५ ने मोठी आहे. म्हणून प्रत्येक बेरीज ७५ ने मोठी आहे.
३ x ३ चं हें सूत्र ९ x ९ च्या चौरसाला पण लागू होतं कां पहावं, म्हणून बघितलं, तर होतं कीं लागू !
11 16 15 56 61 60 47 52 51 369
18 14 10 63 59 55 54 50 46 369
13 12 17 58 57 62 49 48 53 369
74 79 78 38 43 42 2 7 6 369
81 77 73 45 41 37 9 5 1 369
76 75 80 40 39 44 4 3 8 369
29 34 33 20 25 24 65 70 69 369
36 32 28 27 23 19 72 68 64 369
31 30 35 22 21 26 67 66 71 369
369 369 369 369 369 369 369 369 369
आता पटतं ना, कीं गणीती सूत्र सांगणा-या श्लोकात क्रियापदाची काय जरूर ? वाक्य वगैरे नसून सुद्धा किती रोचक सन्देश मांडलाय् ना ?
संस्कृतच्या ज्ञानभांडारात काय काय आहे, त्याची ही एक नुसती झलक आहे !
चाळीस-एक वर्षापूर्वी हा श्लोक “अमृत” मासिकात माझ्या वाचनात आला. वाचनात काय आला, पाठच होऊन गेला. निरनिराळ्या लोकांचे आवडीचे विषय निरनिराळे असतात. पण, हा श्लोक मला वाटतं, सर्वानाच आवडेल !
चला, करून टाका पाठ !
हा श्लोक कुणी रचला असेल ? दुसरं कोण ? भास्कराचार्यांची कन्या लीलावती हिनं, असंही त्या लेखात वाचल्याचं आठवतं.
असंही मनात येतं कीं, हा श्लोक  ३ च्या पटीतील विषम संख्येच्या जादुई चौरसासाठी आहे. सम विषम कुठल्याही चौरसासाठी पण असेल कां एकादा श्लोक ? असला तर काय मजा येईल ! असो.
शुभमस्तु |

-o-O-o-

चला संस्कृत शिकूं या ! – पाठ ९ वा

चला संस्कृत शिकूं या ! – पाठ ९ वा
निरनिराळ्या प्रकारच्या शब्दांसाठी बनवलेली कोष्टकं वापरायची संवय करायला एक सोपं सुभाषित घेऊं.
असा कोष्टकांच्या मदतीनं प्रत्येक शब्दाचा सविस्तर अभ्यास करत सुभाषित समजून घेणं ही अभ्यासाची नवीन पद्धत म्हणतां येईल. पाहूं मजा येते कां, तें.
तर सुभाषित असं आहे –
न कश्चिदपि जानाति किं कस्य श्वो भविष्यति ।
अतः श्वः करणीयानि कुर्यादद्यैव बुद्धिमान् ॥

नेहमीप्रमाणं सगळे शब्द सुटे नजरेत येण्यासाठी सन्धि-विच्छेद करायला हवा. सन्धिविच्छेद करून सुभाषित असं आहे.
न कः-चित् अपि जानाति किम् कस्य श्वः भविष्यति ।
अतः श्वः करणीयानि कुर्यात् अद्य एव बुद्धिमान् ॥
१. न

शब्द: शब्दस्य  जाति: शब्दार्थ:
अव्ययम् नाही
२. कः-चित् इथे “चित्” हा प्रत्यय आहे. तो “किम्” सर्वनामाच्या सगळ्या रूपांना जोडतात. “चित्”-चा उपयोग मराठीतल्या “-ही” सारखा असतो. कुणीही, कुणालाही, कशातही या सगळ्या शब्दात “ही” जसा शब्दाच्या रूपाला जोडलेला आहे. अगदी तसाच संस्कृतमधे “चित्” जोडायचा. त्यामुळं अभ्यास करायचा शब्द म्हणजे “कः”

शब्द: शब्दस्य  जाति: मूलशब्द: लिंगम् विभक्ति: वचनम् शब्दार्थ:
कः सर्वनाम किम् पु. प्रथमा एक. कोण
कः-चित् म्हणजे कोणीही
३. अपि
शब्द: शब्दस्य  जाति: शब्दार्थ:
अपि अव्ययम् सुद्धा, देखील
४. जानाति
शब्द: शब्दस्य  जाति: मूलधातु: गण: पदम् प्रयोजकेन ? प्रयोग: काल: वा अर्थ: वा पुरुष: वचनम् शब्दार्थ:
जानाति क्रियापदम् ज्ञा प.* कर्तरी वर्तमानकाल: तृतीय: एक. जाणतो
* धातु उभयपदी आहे. इथे जानाति हें परस्मैपदी रूप आहे.

५. किम्
शब्द: शब्दस्य  जाति: मूलशब्द: लिंगम् विभक्ति: वचनम् शब्दार्थ:
किम् सर्वनाम किम् नपुं. प्रथमा एक. काय
६. कस्य
शब्द: शब्दस्य  जाति: मूलशब्द: लिंगम् विभक्ति: वचनम् शब्दार्थ:
कस्य सर्वनाम किम् पु. षष्ठी एक. कुणाचे
७. श्वः
शब्द: शब्दस्य  जाति: शब्दार्थ:
श्वः अव्ययम् उद्या
८. भविष्यति
शब्द: शब्दस्य  जाति: मूलधातु: गण: पदम् प्रयोजकेन ? प्रयोग: काल: वा अर्थ: वा पुरुष: वचनम् शब्दार्थ:
भविष्यति क्रियापदम् भू 1 प. कर्तरी द्वितीय-भविष्यकाल: तृतीय: एक. होईल
९. अतः
शब्द: शब्दस्य  जाति: शब्दार्थ:
अतः अव्ययम् म्हणून
१०. श्वः हा शब्द (७) इथे आलेलाच आहे
११. करणीयानि
शब्द: शब्दस्य  जाति: मूलशब्द: मूलधातु: गण: पदम् प्रयोजकेन ? प्रयोग: काल: / अर्थ: लिंगम् विभक्ति: वचनम् शब्दार्थ:
करणीयानि “अनीय”-प्रत्ययान्तम्
धातुसाधितं विशेषणम्
करणीयम् कृ उ. लागू नाही विध्यर्थः नपुं. प्रथमा बहु. करावयाच्या
(गोष्टी)
१२. कुर्यात्
शब्द: शब्दस्य  जाति: मूलधातु: गण: पदम् प्रयोजकेन ? प्रयोग: काल: वा अर्थ: वा पुरुष: वचनम् शब्दार्थ:
कुर्यात् क्रियापदम् कृ प.* कर्तरी विध्यर्थः तृतीय: एक. कराव्यात
* “करणीयानि” शब्दाच्या कोष्टकात दाखवल्याप्रमाणें धातु उभयपदी आहे. इथे “कुर्यात्” परस्मैपदी आहे.
१३. अद्य
शब्द: शब्दस्य  जाति: शब्दार्थ:
अद्य अव्ययम् आज
१४. एव
शब्द: शब्दस्य  जाति: शब्दार्थ:
एव अव्ययम्
१५. बुद्धिमान्
शब्द: शब्दस्य  जाति: मूलशब्द: लिंगम् विभक्ति: वचनम् शब्दार्थ:
बुद्धिमान् विशेषणम् बुद्धिमत् पु. प्रथमा एक. बुद्धिमान्, हुशार, सुजाण
इथे “बुद्धिमत्” हें विशेषण “बुद्धि” या नामाला मत् हा प्रत्यय लागून तयार झाले आहे. “मत्” ह्या प्रत्ययाने “–असलेला, -ली, -लें” अशा अर्थाचे विशेषण तयार होते. म्हणून बुद्धिमत् म्हणजे बुद्धि् असलेला
वर दिलेले शब्दार्थ सुभाषितात शब्द ज्या क्रमाने आहेत त्या क्रमाने लिहून पाहूं.
न कः-चित् अपि जानाति किम् कस्य श्वः भविष्यति ।
अतः श्वः करणीयानि कुर्यात् अद्य एव बुद्धिमान्||

नाही कोणीही सुद्धा जाणतो काय कुणाचे उद्या होईल
म्हणून उद्या करावयाच्या (गोष्टी) कराव्यात आज च सुजा(णाने)
असं शब्दाला शब्द लिहून सुद्धा एकंदरीनं अर्थ लक्षांत येतो. पण प्रत्येक भाषेची वाक्यरचनेची पद्धत असते, विशेषतः पद्याऐवजी गद्यात लिहायची. तशा पद्धतीनं अर्थ लिहावा. याला “अन्वय” म्हणतात. ब-याचदा गद्यात लिहिताना कोणता शब्द कोणत्या क्रमानं घ्यावा, त्याप्रमाणं सुद्धा अर्थात खूप फरक पडतो. त्यामुळं अन्वय लिहिणे हासुद्धा सुभाषित समजून घेण्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो.
जाताजाता, आणखी एक रोचक मुद्दा –
“करणीयानि” या शब्दाचा “करावयाच्या (गोष्टी)” असा अर्थ देताना, (गोष्टी) हा शब्द कंसात दिला. कारण, “करणीयानि” शब्द म्हणून विशेषण आहे. मग त्याचं संबंधित नाम कुठलं हा प्रश्न येतो. संस्कृतमधे इथल्याप्रमाणं विशेषणच नामासारखं वापरलेलं असूं शकतं.
तीच गोष्ट बुद्धिमान् शब्दाची. हा शब्दसुद्धा विशेषण आहे. मराठीत सुद्धा सुजा(णाने) असा नामासारखा दाखवला.
“विशेषण सुद्धा नामासारखं समजून घ्या” असं कवीनं मानणं, हा “समझदारको इशारा काफी होता है ।” अशातला प्रकार आहे. संस्कृत ही मुळातच संस्कारांची भाषा असल्यानं “समझदार”-पणाची कवीनं अपेक्षा ठेवणं यात गैर कांहीच नाही, नाही कां ?
हें सुभाषित छान पण आहे, सोपं सुद्धा आहे. पहा ना –
१. पंधरापैकी ७ शब्द – १, ३, ७, ९, १०, १३, १४ – अव्यये आहेत. त्यातसुद्धा श्वः हा शब्द दोनदा आला आहे.
२. तीन शब्द किम् ह्या एकाच सर्वनामाची रूपे आहेत.
३. कुर्यात् आणि करणीयानि हे दोन्ही शब्द कृ या धातूपासून आहेत.
या सुभाषिताचं तात्पर्य हिंदीत छान सांगता येईल, “कल करेसो आज कर, आज करे सो अब” हें सर्वाना माहीत असतं. पण आचरणात किती येतं, हें प्रत्येकानं स्वतःचं स्वतः तपासावं.
निदान इतकं चांगलं सुभाषित पाठ करण्यात तरी चालढकल नको व्हायला, कसें ?
शुभमस्तु !

-o-O-o-

चला संस्कृत शिकूं या ! – पाठ ८ वा

चला संस्कृत शिकूं या ! पाठ ८ वा
एक खूप चांगलं सुभाषित शिकूं या. यात एक चांगला अनुप्रास आहे. शिवाय सुभाषितकार एका मस्त कविकल्पनेत रमून गेला आहे. या सुभाषितातून तात्पर्य काय काढायचं, तें सुभाषितकारानं वाचकांवर सोडलंय्.
रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम् ।
भास्वानुदेष्यति हसिष्यति पंकजश्रीः ।
इत्थं विचारयति कोषगते द्विरेफे ।
हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार ॥
प्रथम सन्धिविच्छेद करून सगळे शब्द सुटे पाहून घेऊं.
रात्रिः गमिष्यति भविष्यति सु-प्रभातम् ।
भा-स्वान् उदेष्यति हसिष्यति पंक-ज-श्रीः ।
इत्थं विचारयति कोष-गते द्वि-रेफे ।
हा हन्त हन्त नलिनीं गजः उज्जहार ॥
जे शब्द सामासिक आहेत, त्यांची पदे पण वेगळी दाखवली आहेत.
रात्रि: = रात्र
गमिष्यति = जाईल
भविष्यति सुप्रभातम्
भविष्यति = होईल
सुप्रभातम् = चांगली सकाळ
भास्वानुदेष्यति = भास्वान् उदेष्यति
भास्वान् हा शब्द भाः + वत् = भास्वत् ह्या शब्दाचे पुल्लिंगी प्रथमा विभक्ती एकवचनाचे रूप आहे.
भाः = तेज
वत् हा प्रत्यय “ने युक्त” असा अर्थ देतो. मिळून भाः + वत् म्हणजे तेजाने युक्त म्हणजेच सूर्य.तसं तर, तेजाने युक्त हें विशेषण आहे. पण सूर्य हें नाम आहे. अमुक विशेषण कुणाचं खास वैशिष्ट्य असेल, तर विशेषणाचंच नाम होतं. ह्याचं नेहमीच्या माहितीतलं उदाहरण म्हणजे भगवान् हा शब्द. ह्यात सुद्धा भग + वत् असं वत्-प्रत्ययान्त विशेषणच आहे. पण भगवान् हा शब्द नाम म्हणूनच रूढ झाला आहे.
उदेष्यति = उगवेल
हसिष्यति पंकजश्रीः
हसिष्यति = हंसेल
पंक-ज-श्रीः हा सामासिक शब्द आहे. इथे तीन पदे आहेत.
पंक = चिखल
पंके = चिखलात
ज हें सम्पूर्ण पद नाही, उपपद आहे. जायते म्हणजे जगते ह्या अर्थासाठी ज हें उपपद वापरले जाते.
पंकजम् = पंकज = पंके जायते इति पंकजम् हा उपपद तत्पुरुष समास.
चिखलात जगते, तें पंकज म्हणजेच कमळ
श्रीः = वैभव, शोभा
पंकजश्रीः = पंकजस्य श्रीः, षष्ठी तत्पुरुष समास
पंकजश्रीः = कमळाची शोभा
इत्थं विचारयति कोषगते द्विरेफे
इत्थं = असा
विचारयति हा शब्द विचारयन् ह्या शब्दाच्या पुल्लिंगी सप्तमी विभक्तीचे एकवचन.
विचारयन् हा शब्द वि + चर् ह्या धातूच्या प्रयोजकाचे कर्तरी वर्तमानकालवाचक धातुसाधित विशेषण.
विचारयन् = विचार करणारा
विचारयति = विचार करत असताना
कोष-गते = कोषगत ह्या सामासिक शब्दाचे पुल्लिंगी सप्तमी एकवचन
कोषगतः = कोषे गतः, सप्तमी तत्पुरुष समास
कोषे = कोषात
गतः = गेलेला गत हा शब्द गम् ह्या धातूचे कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण आहे.
गतः हे “गत”चें पुल्लिंगी प्रथमा विभक्ती एकवचनाचे रूप आहे.
कोषगते = कोषात गेलेला असताना
द्वि-रेफे = द्वि्रेफ ह्या पुल्लिंगी सामान्यनामाचे सप्तमी एकवचन
द्विरेफः = द्वौ रेफौ यस्य सः, बहुव्रीही समास
द्वौ = दोन; द्वि या संख्याविशेषणाचे पुल्लिंगी प्रथमा द्विवचन. ह्या विशेषणाची रूपे अर्थातच फक्त द्विवचनीच असतात.
रेफौ = रेफ ह्या शब्दाचे प्रथमा द्विवचन. रेफ असा शब्द शब्दकोशात मिळत नाही.  रेफ म्हणजे ‘र’-कार द्वि्रेफ म्हणजे भुंगा. संस्कृतमधे भ्रमर. भ्रमर ह्या शब्दात दोन “र”-कार आहेत. म्हणून ज्याच्या नांवामधे दोन “र”-कार आहेत असा तो द्विरेफ म्हणजे भुंगा
इत्थं विचारयति कोषगते द्विरेफे हा जो शब्दसमुच्चय आहे, तो विशेष विचारात घेण्यासारखा आहे. इथे विचारयति कोषगते द्विरेफे हे तीन शब्द सप्तमी विभक्तीत आहेत. कोषात गेलेला भुंगा विचारात मग्न आहे. असे असताना काय झालं, तें पुढील ओळीत सांगितलं आहे. तें प्रधान वाक्य आहे. आणि “कोषात गेलेला भुंगा विचारात मग्न असताना” अशी गौणवाक्यासारखी रचना इथे तीन शब्दांची सप्तमी वापरून साधली आहे. इथे “विचारात मग्न असणारा भुंगा” हा कर्ता आहे. “विचारात मग्न असणें” ही त्याची क्रिया आहे. “विचारयति” हें क्रिया कोणती, तें सांगणारं धातुसाधित आहे. अशा रीतीनें कर्त्याची आणि धातुसाधिताची सप्तमी वापरून “..असें होत असताना” असा अर्थ साधतात, त्याला “सति सप्तमी” रचना म्हणतात.
सति सप्तमी ह्या रचनेच्या नावात सुद्धा
सति  हें “सत्” ह्या “क. व. धा. वि.”-च्या सप्तमीचं रूप आहे.
(क. व. धा. वि. = कर्तरी वर्तमानकालवाचकम्  धातुसाधितम् विशेषणम्)
“कोषगते”-ची देखील सप्तमी आहे कारण हा शब्द “द्विरेफे”.ह्या शब्दाचं विशेषण आहे. आणि विशेष आणि विशेषण, दोनींची विभक्ती एकच असली पाहिजे, हा पण नियम आहेच.
हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार
हा हन्त हन्त = हें उद्गारवाचक आहे, अर्थ = अरेरे !
नलिनीं = नलिनीम् “नलिनी” ह्या स्त्रीलिंगी नामाचे द्वितीया एकवचन. अर्थ “कमळाला”
गज उज्जहार = गजः उज्जहार
गजः = हत्ती
उज्जहार = उपटले. उत् +  हृ ह्या धातूचे परोक्षभूतकाल तृतीय पुरुष एकवचन.
सुभाषिताचा एकूण अर्थ होतो –
कोषात गेलेला भुंगा विचारात मग्न झाला कीं,
रात्र सरेल, सुप्रभात होईल, सूर्य उगवेल, कमळाची शोभा हंसूं लागेल !
भुंगा अशा विचारात मग्न असतानाच,
अरेरे ! हत्तीने कमळच उपटले !!
एक सुप्रसिद्ध मराठी गाणं आहे –
“घेई छंद, मकरंद । प्रिय हा मिलिन्द । मधुसेवनानन्द । स्वच्छंद, आनन्द ।
मिटता कमलदल । होइ बंदि हा भृंग ।
परि सोडि ना नाद । गुंजनात होइ दंग ।
स्वच्छंद, आनन्द । घेई छंद, मकरंद ..”
ह्या गाण्यात सुभाषितातलाच बराचसा अर्थ सामावलेला आहे ना ?
सुभाषिताचं तात्पर्य काय म्हणायचं ?
“माझी जन्मठेप” ह्या आत्मकथेमधे सावरकरानी एक बोधवाक्य लिहिलं आहे, “प्रतिकूल तेंच नेहमी घडेल”. संध्याकाळी कमळ मिटायच्या आधी कमळाच्या कोषात शिरलेल्या भुंग्याला वाटलं, आतां रात्र सरून, पहाटेनंतर सूर्य उगवेल, आणि कमळ पुन्हा उमलेल, तोपर्यन्त आपल्याला कमळाच्या कोषातील मध मनसोक्त चाखता येईल. अरेरे ! पण एका हत्तीनं कमळच उपटलं !!
इंग्रजीत एक म्हण आहे, “Man proposes, God disposes !!”
तेव्हां स्वप्नरंजनात दंग न होतां प्रतिकूल पण काही घडूं शकतं याचं भान ठेवलं पाहिजे.
माझे एक स्नेही श्री. प्रकाश कुलकर्णी यानी म्हटलं, “भुंगा कमळाच्या पाकळ्या पोखरून बाहेर पण येऊं शकला असता. पण त्याला कमळाला इजा करायची नव्हती. हत्तीनं मात्र कमळाच्या बाबतीत कसला भावुकपणा दाखवला नाहीं.”
ह्याच श्लोकाबद्दल मी असं पण वाचलं कीं, हत्तीनं तर लक्ष्मीला अर्पण करण्यासाठी म्हणून कमळ तोडलं !
सुभाषितकारानं सुभाषित काय लिहिलं, कीं लोकाना आणखी विचार सुचूं लागले !
आणि कुणी शास्त्रीय गायनासाठी पद पण रचलं !
हें सुभाषित अभ्यासाला घेण्यात अजूनही एक विचार होता. इथल्या चार ओळीत गमिष्यति, भविष्यति, उदेष्यति, हसिष्यति, विचारयति, गते, उज्जहार अशी धातूंची आणि धातुसाधितांची रूपे आहेत. “पंकज”-मधला “ज” सुद्धा क्रियासूचक आहे. अर्थातच या सुभाषिताच्या निमित्तानं धातूंची रूपं कशी-कशी होतात, याची थोडीशी तोंडओळख करून घेऊं.
अर्थातच गमिष्यति, भविष्यति, उदेष्यति, हसिष्यति ही गम्, भू, उत् + इ, हस् ह्या धातूंची भविष्यकाळाची, तृतीयपुरुषी एकवचनी रूपे आहेत.
विचारयति, गते आणि उज्जहार ह्यांचा खुलासा वर केलेलाच आहे. धातूंपासून धातुसाधितं बनवावीत आणि त्यांच्याकडून क्रियापदाचं कार्य साधावं, अगदी सति सप्तमी सारखी विशेष वाक्यरचना सुद्धा, हा संस्कृत भाषेचा एक अनोखा पैलू आहे. किंबहुना संस्कृत भाषेत “धातु” या संकल्पनेचाच फार मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे, असं म्हटलं तर ती अजिबात अतिशयोक्ति होणार नाहीं.
धातु ह्या अशा संकल्पनेची कांही महत्त्वाची अंगे म्हणजे –
१. क्रियापदाच्या मूळ शब्दाला धातु असे म्हणतात
२. प्रत्येक धातु दहा पैकी एका किंवा अधिक गणाचा असतो. १ ते १० गण ही संकल्पना थोडी क्लिष्ट आहे. तें नंतर कधी तरी पाहूं.
३. अमुक धातु एकपेक्षा अधिक गणांचा देखील असतो.
४. धातूंची रूपें बनण्याचे मुख्यतः दोन प्रकार आहेत – परस्मैपदी आणि आत्मनेपदी
५. कुठल्याशा धातूची रूपे दोन्ही प्रकारानी बनत असतील, तर त्याला उभयपदी म्हणतात.
६. धातूंची रूपे वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ अशा काळांमुळे किंवा आज्ञार्थ, विध्यर्थ, आशीर्वादार्थ अशा “अर्था”नुसार बदलतात.
७.धातूंची रूपे (मी-आम्ही=) प्रथमपुरुष, (तूं-तुम्ही =) द्वितीयपुरुष, (तो-ती-तें, ते-त्या-तीं =) तृतीयपुरुष अशा पुरुषांनुसार आणि एकवचन, द्विवचन, बहुवचन अशा वचनानुसार सुद्धा बदलतात.
८. संस्कृतमधे काळ आणि अर्थ मिळून दहा प्रकार आहेत. त्यांना “ल”-कारांची नांवें दिली आहेत, त्याचाही श्लोकच आहे, तो असा –
लट् वर्तमाने लोट् वेदे भूते लुङ् लङ् लिटस्तथा ।
विध्याशिषौ लिङ्लेटौ लुट् लृट् लृङ् च भविष्यतः ॥
भूतकाळ ३ प्रकारचे आहेत ! भविष्यकाळ सुद्धा ३ प्रकारचे आहेत !
थोडे सुटसुटीतपणे हे लकार असे पण पाहूं शकतो –
“भू” (म्हणजे होणे, असणे) ह्या धातू्च्या तृतीय पुरुषी एकवचनी रूपानी हे प्रकार समजायला सोपे होतील, म्हणून ती पण सोबत दिली आहेत.
लट् लिट् लुट् लृट् लेट् लोट्
लट् = वर्तमानकाळ (उदा. – भवति)
लिट् = भूतकाळ (याला परोक्षभूतकाळ असंही म्हणतात.) (उदा. – बभूव)
लुट् = भविष्यकाळ (उदा. भविष्यति)
लृट् = भविष्यकाळ (उदा. – भविता)
लेट् = आशिर्वादार्थ (उदा. – भूयात्)
लोट् = आज्ञार्थ (संस्कृतमधे याचे नांव “वेद” असे सुद्धा आहे) (उदा. – भवतु)
लङ् लिङ् लुङ् लृङ्

लङ् = भूतकाळ (याला अनद्यतन भूतकाळ असं सुद्धा म्हणतात.) (उदा. – अभवत्)

लिङ् = विध्यर्थ (उदा. – भवेत्)
लुङ् = भूतकाळ (हा प्रकार केवळ जुन्या साहित्यातच कधीमधी दिसतो) (उदा. – अभूत्)
लृङ् = भविष्यकाळ (उदा. – अभविष्यत्)
९) अमुक वाक्यात क्रियापद कर्तरी, कर्मणी किंवा भावे प्रयोगाचे असेल तर त्यानुसार सुद्धा धातूच्या रूपात बदल होतो.
१०) शिवाय क्रियापद प्रयोजकाच्या अर्थाने वापरायचे असेल, त्यानुसार सुद्धा धातूच्या रूपात बदल होतो.
अमुक धातु शब्दकोशात पाहूं गेलो, तर सामान्यपणे अशी माहिती मिळेल.
धातु: गण: पदम् वर्त. तृ. पु. एक. क. भू. धा. वि.
1 म् 1 प. गच्छति गत
2 भू 1 उ. भवति भूत
3 त् 2 उ. उदेषति-ते उदेषित
4 स् 1 प. हसति हसित
5 वि + चर् (प्रयोजक) 1 प. विचारयति विचारित
6 त् +  हृ 1 उ. उद्धरति-ते उद्धृत
शब्दकोशात सामान्यपणे उपसर्गाशिवाय असलेले आणि कर्तरी प्रयोगात, विना-प्रयोजक, वापरायचे धातु दिलेले असतात. पण जोडीला कोणता उपसर्गा आल्यास अर्थ कसा बदलतो, तेंही ब-याचदा दिलेले असते.
वरील कोष्टकात
प. = परस्मैपदी
उ. = उभयपदी
वर्त. तृ. पु. एक. = वर्तमाने तृतीय-पुरुषीयम् एकवचनम्
क. भू. धा. वि. = कर्मणि-भूतकालवाचकम् धातुसाधितम् विशेषणम्
धातूंपासून सामान्यपणें पुढीलप्रकारची विशेषणें, क्रियाविशेषणें, अव्यये बनविली जातात.
1. कर्मणि-भूतकालवाचक धातुसाधित विशेषण उदा. गत
2. कर्तरी वर्तमानकालवाचक धातुसाधित विशेषण उदा. विचारयन्
3. य तव्य अनीय हे प्रत्यय वापरून तयार होणारी धातुसाधित विशेषणे उदा. कृ धातूपासून कार्य, कर्तव्य, करणीय
4. “तुम्”-प्रत्यय वापरून धातूपासून बनणारी क्रियाविशेषणे उदा. कृ पासून कर्तुम् (अर्थ – करण्यासाठी)
5. त्वा किंवा य प्रत्यय जोडून धातूपासून बनणारी अव्यये उदा.  गम् धातूपासून गत्वा म्हणजे जाऊन “नि + हन्” पासून निहत्य. जेव्हा धातूबरोबर “नि”-सारखा कुठला उपसर्ग असेल, तेव्हां “त्वा”-ऐवजी “य” प्रत्यय वापरायचा.
संस्कृतमधे वाक्यात वापरावयाचे शब्द पांच प्रकारचे असतात.
१. नामें, सर्वनामे व विशेषणें यांची लिङ्ग, विभक्ति व वचन यानुसार होणारी रूपे
२. धातूंची काळ, अर्थ, प्रयोग, प्रयोजक, पुरुष व वचन यानुसार होणारी रूपे
३. धातुसाधित विशेषणांची लिङ्ग, विभक्ति व वचन यानुसार होणारी रूपे
४. धातुसाधित अव्यये, क्रियाविशेषणे
५. उद्गारवाचक, नकारात्मक, शब्दसंयोगी अव्यये
कोणत्याही काव्याचा किंवा उता-याचा अभ्यास करताना शब्द-न्-शब्द अभ्यासायचा असेल, तर ह्या पांचही प्रकारच्या शब्दासाठी पांच प्रकारचे तक्ते आपण तयार करूं शकतो.
उदाहरणादाखल आपण ह्या सुभाषितातच आलेले चार प्रकारचे शब्द पाहूं.
शब्द: शब्दस्य  जाति: मूलशब्द: लिंगम् विभक्ति: वचनम् शब्दार्थ:
रात्रि: सामान्यनाम रात्रि स्त्री. प्रथमा एक. रात्र

 

शब्द: शब्दस्य जाति: मूल-धातु: गण: पदम् प्रयोजकेन? प्रयोग: काल:/अर्थ: पुरुष: वचनम् शब्दार्थ:
गमिष्यति क्रियापदम् म् 1 प. कर्तरी लुट्’- भविष्य: तृतीय: एक. जाईल, सरेल


शब्द: शब्दस्य  जाति: शब्दार्थ:
इत्थम् अव्ययम् अशा रीतीने


शब्द: शब्दस्य जाति: मूलशब्द: मूलधातु: गण: पदम् प्रयोजकेन? प्रयोग: काल:/अर्थ: लिंगम् विभक्ति: वचनम् शब्दार्थ:
विचारयति क. व. धा. वि. विचारयन् वि + चर् 1 प. म्=होय कर्तरी वर्तमान पु. सप्तमी एक. विचार करीत

असताना

या “विचारयति” च्या कोष्टकात क. व. धा. वि. = कर्तरी वर्तमानकालवाचकम्  धातुसाधितम् विशेषणम्
प्रत्येक शब्दाचा असा सविस्तर अभ्यास झाला, कीं चांगला अभ्यास झाला, असं खरंच वाटतं ना ?
तर मग स्वाध्याय म्हणून इतर शब्दांचा अभ्यास करून पाहणार ?
शुभमस्तु |

-o-O-o-

चला संस्कृत शिकूं या ! – पाठ ७ वा

चला संस्कृत शिकूं या ! – पाठ ७ वा

ह्या खेपेस कांहीसा लांबडा श्लोक निवडला आहे –


रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ॥
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् ।
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥

ह्या श्लोकाचा अर्थ समजून घेण्याआधी ह्या श्लोकाच्या कांही रोचक बाबी पण पाहून घेऊं, कसें ?
1. ह्या श्लोकात अर्थातच श्रीरामांचे वर्णन आहे. हा श्लोकच मुळात श्रीरामरक्षास्तोत्रम् ह्या स्तोत्रातला आहे.
2. इथल्या चारी ओळीत प्रत्येकी १९ अक्षरे आहेत. अक्षरांच्या मात्रा २-२-२, १-१-२, १-२-१, १-१-२, २-२-१, २-२-१, २ अशा आहेत. म्हणजेच तीन मात्रांचा एक गण या पद्धतीने इथे म, स, ज, स, त, त, ग हे गण आहेत. अशा प्रकारच्या काव्यरचनेला शार्दूलविक्रीडित- वृत्त असे म्हणतात.
“मासाजासतताग येति गण हे शार्दूलविक्रीडिती” असं या वृत्ताचं खुणेचं सूत्र आहे.
लग्नात किंवा मुंजीत मंगलाष्टके म्हणतात ना, ती बहुतेक ह्या वृत्तातील असतात.

3. ह्या श्लोकात प्रत्येक ओळीत दोन-दोन वाक्ये आहेत. तेव्हा हा श्लोक समजून घ्यायचा म्हणजे, छोटी-छोटी ८ वाक्ये समजून घ्यायची, इतकेच.

चला तर मग सुरूं करूं या.

रामो राजमणिः = राम: राजमणिः

राम: = राम
राजमणिः = राजानाम् मणिः
राजानाम् = राजांचा , राजांमध्ये
मणिः = मणी
राजानाम् मणिः = राजांमध्ये मणी

सदा = सदा, नेहमी
विजयते = विजयी असतो

रामो राजमणिः सदा विजयते = राजांमध्ये मणी (असा) राम नेहमी विजयी असतो.

रामं = रामम् = रामाला
रमेशं = रमेशम्
रमेश: = रमायाः ईशः (षष्ठी-तत्पुरुष- समासः)
रमायाः = रमाचा रमा म्हणजे विष्णूची पत्नी
ईशः = धनी, मालक, पति, देव
रमायाः ईशः = रमाचा पति, म्हणजे विष्णू
भजे = (मी) भजतो, भजन करतो, भक्ति करतो

रामं रमेशं भजे = (मी) रामाची (म्हणजेच) रमेशाची भक्ति करतो.

रामाची भक्ति म्हणजेच रमेशाची भक्ति असं म्हणण्यामागे तर्क इतकाच समजायचा, कीं विष्णूच्या दशावतारापैकीच राम हा सातवा अवतार.

दशावतार म्हणजे – मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्कि.

दशावतारांच्या ह्या पौराणिक कथांबद्दल मला नेहमीच असं वाटतं कीं, दशावतारांची संकल्पना म्हणजे जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा शास्त्रीय सिद्धांत आहे. पृथ्वीचा गोळा थंड होण्याबरोबर जी जीवसृष्टी निर्माण झाली, ती सर्वप्रथम पाण्यामधेच निर्माण होणं शक्य होतं. पाण्यामधे सुद्धा प्रथम पाणवनस्पती झाल्या. पण त्या चर म्हणजे स्थलांतर करूं शकत नव्हत्या. चर जीवसृष्टीचं पहिलं रूप म्हणून दशावतारामध्ये मत्स्य म्हणजे मासा. माशानंतर कूर्म म्हणजे कासव, जें पाण्यात आणि जमीनीवर सुद्धा हिंडू शकतं, पण खूप हळूं. नंतर तिसरा वराह म्हणजे गेंडा, जो अगदी जमीनीवर नाही, पण उथळ पाण्यात राहतो. त्यानंतर चौथा नृसिंह जो अर्धा सिंह, अर्धा माणूस. नंतर पांचवा वामन, हा पूर्ण माणूस पण लहान. नंतर सहावा परशुराम, हा पूर्ण माणूस पण रानटी. सातवा राम, हा आदर्श माणूस. आठवा कृष्ण हा सगळ्या मानवी भावभावनाना पुरून उरणारा. नववा बुद्ध हा आत्मज्ञानी. दहावा कल्कि ज्या युगात नेहमी बरं आणि वाईट यांचा संघर्ष चालूं असतो.

दशावतारांच्या ह्या संकल्पनेबरोबरच कालगणनेची संकल्पना सुद्धा जोडलेली आहे. ही सुद्धा शास्त्रीय संकल्पनाच आहे. चार युगांचा काल  कृत त्रेता द्वापार कलि ह्याक्रमानं उलटत असतो. श्रीरामावतार हा कृत-युगाच्या म्हणजेच सत्ययुगाच्या अखेरीचा अवतार. त्यानंतर त्रेतायुग. त्रेतायुगाबद्दल कुठली पौराणिक संकल्पना जोडलेली आहे, तें मला तरी माहीत नाही. श्रीकृष्णावतार हा द्वापारयुगाचा म्हणतात. आणि सध्या चालूं आहे, तें कलियुग.

संस्कृत शिकायचं म्हणजे नुसतीच एक नवीन भाषा शिकायची, असं तर नाहीच, ना !

भजे हा शब्द देखील मननीय आहे. भजे पासून “भजनम्” ह्या नामाचे दोन अर्थ आहेत. (१) गायचं भजन, भक्तिगीत (२) भजन म्हणणे.

हे दोन्ही अर्थ मिळून, भजे ह्या श्लोकातील शब्दाचा अर्थ नुसता “मी भजतो, भक्ति करतो”, असा न घेता, “मी भजन म्हणत, भजन गात भक्ति करतो” असा गोड अर्थ अधिक भावणारा आहे.

“भजे” हा शब्द “भज्” ह्या धातूचे रूप आहे. आत्ताच म्हटलेला “भक्ति” हा शब्द सुद्धा “भज्” ह्या धातूपासूनच बनलेलं आणखी एक नाम. भक्तीचे नऊ प्रकार सांगतात – “नवविधा भक्ति” श्रीसाईसच्चरितात २१ व्या अध्यायात घोड्याच्या नऊ लेंड्या गोळा करणा-या सौदागराची गोष्ट सांगून बाबानी नवविधा भक्तीच सुचवली. त्याचे अभंगवृत्तात जें विवरण जुळवले ते असे –
शुकसंकीर्तन । परीक्षितश्रवण । सदा विष्णुस्मरण । प्रल्हादाचे ॥
चरणसेवन । करी स्वये लक्ष्मी । करीतो वंदन । अक्रूर कीं ॥
दासश्रेष्ठ कोण । भक्त हनुमान । सखा तो अर्जुन । कुंतीपुत्र ॥
आत्मनिवेदन । बळीराजा करी । भक्ती ऐशापरी । नवविधा ॥

आतां पुढील वाक्याकडे वळूं.

रामेणाभिहता = रामेण + अभिहता
रामेण = रामाने
अभिहता = मारली

ह्या दोन्ही शब्दांचा थोडा अधिक विचार करूं.
रामेण = रामाने

तुमच्या हें लक्षात आलं कां, कीं पहिल्या वाक्यात रामः हा शब्द कर्ता होता. दुस-या वाक्यात हाच शब्द रामम् असा होता. इथे तो रामेण असा आहे. म्हणजेच राम ह्या मूळ शब्दाची निरनिराळी रूपं आपल्याला या श्लोकात दिसताहेत.

कर्त्याची विभक्ति प्रथमा असते. त्यामुळं रामः हें राम ह्या शब्दाचं प्रथमा विभक्तीचं रूप.

रामं रमेशं भजे म्हणजे मी रामाला भजतो. इथे रामम् हा शब्द वाक्यात कर्म आहे. कर्माची विभक्ति द्वितीया असते. रामम् हें राम ह्या शब्दाचं द्वितीया विभक्तीचं रूप आहे.

रामेण = रामाने ही आता तृतीया विभक्ति आहे.

आतां तुमच्या लक्षात आलं असेल कीं ह्या श्लोकात राम ह्या शब्दाची सगळ्या आठी विभक्तींची रूपं अगदी क्रमानं आली आहेत. म्हणून तर हा श्लोक निवडला आहे ! प्रत्येक ओळीत दोन विभक्त्या आणि चारी ओळी शार्दूलविक्रीडित वृत्तात चपखल जमवलेल्या.

अभिहता = पूर्णतः मारली इथे “पूर्णतः” हा अर्थ “अभि” ह्या उपसर्गामुळं आहे. तसे उपसर्ग बरेच असतात. क्रमाक्रमानं आपल्याला त्यांची ओळख होईल.

निशाचरचमू रामाय = निशाचरचमूः रामाय

हा सन्धि आहे. हा सन्धि होताना “निशाचरचमूः” ह्या शब्दातल्या शेवटच्या विसर्गाचा लोप झालेला आहे. कोणता सन्धि कसा होतो, याचे बरेच नियम बसवलेले आहेत. त्यांचाही परिचय ओघाओघानं होईल.

निशाचरचमूः = निशा + चर + चमूः
इथे तीन पदे आहेत. मिळून निशाचरचमूः हा सामासिक शब्द बनलेला आहे.
निशाचर ह्या पहिल्या दोन शब्दांच्या समुच्चयात निशा ह्या शब्दाला चर हें उपपद जोडलेले आहे.
निशा म्हणजे रात्र.
चर म्हणजे फिरणारे, भटकणारे.
मिळून निशाचर म्हणजे रात्री भटकणारे, भुते, राक्षस वगैरे. रावणाच्या सेनेतील सर्व राक्षस असे रात्री-बेरात्री भटकूं शकणारे म्हणजे निशाचर होते.
चमूः = सेना
निशाचरचमूः = निशाचराणाम् चमूः  (निशाचरांची सेना) हा षष्ठी तत्पुरुष समास.
रामेणाभिहता निशाचरचमूः रात्री भटकूं शकणा-यांची सेना रामाने पूर्णतः मारली.
हा कर्मणी प्रयोग आहे. हा कर्मणी प्रयोग अभिहता ह्या अभि + हन् ह्या मूळ धातूच्या कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणानं साधला आहे. असं संस्कृतमधे क्रियापद दिसत नसलं तरी धातुसाधिताकडून क्रियापदाचं काम करवून घेण्याची पद्धत देखील आहे.

रामाय तस्मै नमः

रामाय म्हणजे रामाला. रामाय हा शब्द राम ह्या मूळ शब्दाच्या चतुर्थी विभक्तिचं रूप आहे.

तस्मै म्हणजे त्याला. जसं रामाय हें राम ह्या शब्दाचं चतुर्थी विभक्तीचं रूप, तसं तस्मै हें तत् ह्या सर्वनामाचं चतुर्थी विभक्तीचं रूप. ज्या कुठल्या सर्वनामाचा ज्या नामाशी संबंध असेल, त्या नामाची जी विभक्ति, तीच त्या सर्वनामाची पण विभक्ति.

नमः म्हणजे नमस्कार असो.

रामाय तस्मै नमः म्हणजे “त्या रामाला नमस्कार असो.” ज्याला नमः म्हणायचं त्याची चतुर्थी विभक्ति वापरायची.

रामान्नास्ति = रामात् न अस्ति
हा देखील तीन शब्दांचा सन्धि आहे.

रामात् म्हणजे रामाहून ही राम ह्या शब्दाची पञ्चमी विभक्ति आहे.

न म्हणजे नाही.

अस्ति म्हणजे आहे.

परायणं  = परायणम्  = परम् अयनम् हा कर्मधारय समास आहे.

परम् आणि अयनम् यांचा मिळून सामासिक शब्द बनताना अयनम् मधल्या “न” चा “ण” झालेला आहे. परायनम् म्हणून बघा बरं, बरोबर वाटत नाही. केव्हा न चा ण व्हावा अशा बारीकसारीक गोष्टींचे सुद्धा नियम आहेत. संस्कृतमधे सगळं असं साच्यात बसवलेलं आहे. जितकी संस्कृतची संवय होईल, तितके उच्चार देखील शुद्ध आणि स्पष्ट होतील. संस्कृत कां शिकायचं, त्यानं कायकाय फायदे होतात, तें जरूर लक्षात घेत रहायचं.

परम् म्हणजे दुसरे

अयनम् म्हणजे जाण्याचे (आस-यासाठी जाण्याचे) ठिकाण

परतरं = परतरम् इथे पर ह्या शब्दाला “तर” हा प्रत्यय जोडल्याने “अधिक दुसरे”, “याहून दुसरे” असे, “पर” ह्या विशेषणाचे “याहून अधिक” ह्या भावाचें विशेषण तयार होते. “सगळ्यात अधिक” अशा अर्थाच्या विशेषणासाठी “तम” हा प्रत्यय जोडतात.

रामान्नास्ति परायणम् परतरम् = रामाहून अधिक दुसरे (आस-यासाठी) जाण्याचे ठिकाण नाही (आहे).

रामस्य दासो ऽ स्म्यहम् = रामस्य दासः अस्मि अहम्

रामस्य = रामाचा
इथे रामस्य हे राम ह्या शब्दाचे षष्ठी विभक्तीचे रूप आहे.

दासः = दास, सेवक

अस्मि = (मी) आहे

अहम् = मी

रामस्य दासः अस्मि अहम् = मी रामाचा दास आहे. संत रामदासानी “आपण रामाचे दास आहोत” ही जाणीव कायम मनात राहण्यासाठी “रामदास” हें टोपण नांव घेतले.

रामे चित्तलयः सदा भवतु मे

रामे = रामाच्या ठिकाणी
इथे रामे हा शब्द “राम” ह्या मूळ शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे. “च्या ठिकाणी”, “वरती”, “खालती”, “मध्ये” अशा जागा दाखवण्यासाठी वापरतात.

चित्तलयः = चित्तस्य लयः हा षष्ठी तत्पुरुष समास आहे.

चित्तस्य = मनाचे

लयः = मिळून जाणे

सदा = नेहमी

भवतु = होवो, होऊं दे

मे = माझा, माझी, माझे

रामे चित्तलयः सदा भवतु मे = माझ्या मनाचे मिळून जाणे नेहमी रामाच्या ठिकाणी होऊं दे.

भो राम मामुद्धर = भोः राम माम् उद्धर

भोः = हें “हे !, “अहो!” या अर्थाचे उद्गारवाचक अव्यय आहे.

राम = हें राम ह्या शब्दाचे संबोधन-विभक्तीचे रूप आहे.

माम् = मला

उद्धर =  वरच्या दर्जाला ने. उद्धर हें उत् + हृ ह्या धातूचे आज्ञार्थी द्वितीय पुरुष एकवचनाचे रूप आहे.

भो राम मामुद्धर = भोः राम माम् उद्धर = हे रामा मला वरच्या दर्जाला ने. (हे रामा, माझा उद्धार कर).

एकूण श्लोकाचा अर्थ असा –
राजांमध्ये मणि (असा) राम नेहमीच विजयी होतो. मी रामाची जो रमाचा पति (सुद्धा आहे), (त्याची) भजन गाऊन भक्ति करतो.
निशाचरांची सेना रामाने पूर्णतः नष्ट केली. माझा त्या रामाला नमस्कार असो.
रामापरते अधिक (आश्रयासाठी) जाण्याचे ठिकाण नाही. मी रामाचा दास आहे.
माझ्या मनाचे मिळून जाणे नेहमी रामाच्या ठिकाणी होवो. हे रामा, माझा उद्धार कर.


आपण मारुतीच्या देवळात जातो, तेव्हां “मनोजवम्..” म्हणतो. गणपतीच्या देवळात “प्रणम्य शिरसा देवम् …” म्हणतो. त्याप्रमाणं श्रीरामाच्या देवळात म्हणायला ही चांगली प्रार्थना आहे.

ह्या श्लोकाच्या निमित्तानं “राम” अ-कारान्त पुल्लिंगी नामाची आठही विभक्तींची एकवचनी रूपं आपल्याला समजली.

“राम” ह्या शब्दाप्रमाणेच बालः म्हणजे मुलगा ह्या शब्दाची (अ-कारान्त पुल्लिंगी नामाची) रूपे आठही विभक्तींमधे आणि एकवचनम् द्विवचनम् बहुवचनम् अशा तीनही वचनामधे कशी होतात, तें पुढील तक्त्यात दिलें आहे.

विभक्ति: एकवचनम् द्विवचनम् बहुवचनम्
प्रथमा बाल: बालौ बाला:
द्वितीया बालम् बालौ बालान्
तृतीया बालेन बालाभ्याम् बालै:
चतुर्थी बाला बालाभ्याम् बालेभ्य:
पञ्चमी बालात् बालाभ्याम् बालेभ्य:
षष्ठी बालस्य बालयो: बालानाम्
सप्तमी बाले बालयो: बालेषु
संबोधन हे बाल हे बालौ हे बाला:
ह्या पाठातच “राम” सारखे अ-कारान्त पुल्लिंगी नाम असलेले अजूनही पाच शब्द आहेत.
लिहा बरं कोणते ते  ______ , ________ , ________ , _______ , _______

अ-कारान्त नपुंसकलिंगी नामाची रूपं प्रथमा, द्वितीया आणि सम्बोधन ह्या विभक्तींमधे वेगळी होतात. बालक (म्हणजे मूल) ह्याची रूपे पुढील तक्त्यात दिली आहेत.

विभक्ति: एकवचनम् द्विवचनम् बहुवचनम्
प्रथमा बालकम् बालके बालकानि
द्वितीया बालकम् बालके बालकानि
तृतीया बालके बालकाभ्याम् बालकै:
चतुर्थी बालका बालकाभ्याम् बालकेभ्य:
पञ्चमी बालकात् बालकाभ्याम् बालकेभ्य:
षष्ठी बालकस्य बालकयो: बालकानाम्
सप्तमी बालके बालकयो: बालकेषु
संबोधन हे बालक हे बालके हे बालकानि

ह्या पाठात आणखी अ-कारान्त नपुंसकलिंगी नामे पण आहेत. आणि आपण ब-याचदा वापरतो आहोत तें “वचन” हें नाम पण आहेच.
आणखी कोणती आहेत, पहा बरं  ________ , _________ , _________

बाल आणि बालक यांच्या ओघानं येणारं आकारांत स्त्रीलिंगी नाम म्हणजे बाला (म्हणजे मुलगी). ह्या शब्दाची देखील रूपे पुढील तक्त्यात दिली आहेत.

विभक्ति: एकवचनम् द्विवचनम् बहुवचनम्
प्रथमा बाला बाले बाला:
द्वितीया बालाम् बाले बाला:
तृतीया बाया बालाभ्याम् बालाभि:
चतुर्थी बालायै बालाभ्याम् बालाभ्य:
पञ्चमी बालायाः बालाभ्याम् बालाभ्य:
षष्ठी बालायाः बालयो: बालानाम्
सप्तमी बालायाम् बालयो: बालासु
संबोधन हे बाले हे बाले हे बाला:
या पाठात कांहीं आकारांत स्त्रीलिंगी शब्द सुद्धा आहेत.
कोणते पहा बरं ________ , _________ , _________

या पाठात आपण कांही साधी, सोपी छोटी वाक्ये पण पाहिली. अशी वाक्यं बनवण्याचा हा एक स्वाध्याय –
१. एक वाक्य तर येऊन गेलेलंच आहे, तें पुन्हा लिहा “मी सेवक आहे” _____  ______ ______ |

२. मी मुलगा आहे ______  ______  ______ |

३. मी मुलगी आहे.  ______ ________ _______ |

४. आतां “वदति” (एकजण) बोलतो, “वदतः” (दोघे) बोलतात, “वदन्ति” (अनेकजण) बोलतात ह्या “वद्” ह्या क्रियापदाच्या रूपांचा उपयोग करून पुढील वाक्ये बनवा –
अ) मुलगा बोलतो ______ ______ |
आ) दोन मुले बोलतात ______ ______ |
इ) (अनेक) मुले बोलतात ______ ______ |
ई) मूल बोलते _____ ______ |
उ) दोन (लहान) मुले बोलतात _____ ______ |
ऊ) (अनेक) बाळे बोलतात _____ ______ |
ए) मुलगी बोलते _____ ______ |
ऐ ) दोन मुली बोलतात _____ ______ |
ओ ) (अनेक) मुली बोलतात _____ ______ |
मजा आली कां, संस्कृतमधे वाक्ये बनवताना ?

या पाठात आलेले
(a) अ-कारान्त पुल्लिंगी शब्द आहेत – रमेश, ईश, मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, अभिहत (हें विशेषण आहे), निशाचर, राक्षस, दास, परतर (हें सुद्धा विशेषण आहे), तत्पुरुष, पुरुष, समास आणि लय

(b) अ-कारान्त नपुंसकलिंगी शब्द आहेत – भजन, अभिहत (विशेषण असल्यानें नपुंसकलिंगी सुद्धा), परायण, अयन, परतर (विशेषण), चित्त, वचन

(c) आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहेत – रमा, अभिहता (विशेषण), निशा,

ह्या सगळ्या शब्दांची दिलेल्या नमून्याप्रमाणे सर्व विभक्ती-वचनांची रूपें आता बनवता येतील.

जातांजातां सर्वनामाबद्दल जो नियम सांगितला, तोच विशेषणानाही लागू आहे. ज्या नामाशी विशेषणाचा संबंध असेल, त्या नामाचें जें लिंग, जी विभक्ती, जें वचन असेल, तेंच लिंग, तीच विभक्ती, तेंच वचन त्या विशेषणाचं सुद्धा असायला हवं. या नियमाचा पण एक श्लोक आहे ! –

यल्लिंगम् यद्वचनम् या च विभक्तिर्विशेषस्य
तल्लिंगम् तद्वचनम् सा च विभक्तिर्विशेषणस्यापि

शुभमस्तु |

-o-O-o-

चला संस्कृत शिकूं या ! पाठ ६

चला संस्कृत शिकूं या !
पाठ ६

हया आधीच्या पाठामध्ये दिलेल्या शब्दसंग्रहातील शब्द सुचवलेल्या क्रमाने लिहून सुभाषित जुळवायचे अशी पद्धत होती. ह्या पाठापासून सुभाषित समजून घ्यायचं तर त्यातल्या शब्दाशब्दाचा अर्थ समजून घेऊनही कसं जमेल, तें पहावं, असा विचार आहे. पाहूं कसं जमेल तें. सुभाषित आहे –

अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ।

शब्दाशब्दाचा अर्थ समजून घ्यायचा, तरी त्याला सुद्धा कांही पद्धत असावीच लागेल. संस्कृतमधे, शब्दांचे संधि असतात, समास असतात. त्यामुळं संधिविच्छेद आणि समासविग्रह केल्यानंतरच शब्दापर्यंत पोचतां येतं. म्हणून पद्धत म्हणजे हीच कीं आधी संधिविच्छेद करायचे. हेंच सुभाषित संधि विच्छेद करून लिहायचं, म्हटलं कीं असं होईल.

अयं निजः परः वा इति गणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानाम् तु वसुधा एव कुटुम्बकम् ॥

अयं  = हा
निजः = आपला
परः = दुसरा
वा = किंवा, अथवा
इति = असे
गणना = म्हणणे
लघुचेतसाम् =  हा समास आहे. यात लघु आणि चेतस् ही दोन पदे आहेत.

लघु = लहान
चेतस् = मन, विचार, बुद्धि
लघुचेतस् = लहान आहे मन ज्याचे असा. हा बहुव्रीहि समास. संस्कृतमधे लघु चेतः यस्य सः
लघुचेतसाम् = लघुचेतस् ह्या शब्दाचे पुल्लिंगी षष्ठी बहुवचन म्हणून अर्थ “लहान मनाच्या लोकांचा”


उदारचरितानाम् = हा देखील समास आहे. इथे उदारम् आणि चरितम् ही पदे आहेत. यस्य सः –> ते –> तेषां –>

उदारम् = उदार
चरितम् = चरित्र, जीवन, विचार
उदारचरित = उदार आहेत विचार ज्याचे, असा. हा देखील बहुव्रीहि समास. संस्कृतमधे, “उदारम् चरितम् यस्य सः”
उदारचरितानाम् = उदारचरित ह्या शब्दाचे पुल्लिंगी षष्ठी बहुवचन म्हणून अर्थ “उदार विचारांच्या लोकांचे”

तु = मात्र
वसुधा = पृथ्वी

वसुधा ह्या शब्दामधे सुद्धा दोन पदे आहेत – वसु आणि धा. “धा” हें सम्पूर्ण पद नाहीं, उपपद आहे. तरी पण त्यालाही अर्थ आहे. उपपदाच्या अर्थासकट वसुधा सारख्या शब्दांचा अर्थ सूत्राच्या पद्धतीनं मांडतात. जसं “वसुभि: धार्यते अतः वसुधा” म्हणजे, वसू जिची धारणा करतात, ती. साहजिकच विचार येतो, हे वसू कोण ? सूत्रांची हीच गंमत आहे. सूत्र म्हणजे सूत, धागा. सूत मिळालं कीं स्वर्ग गांठायची प्रेरणा होतेच. आपण सूत्रसंचालन म्हणतो. सूत्रानं अशी चालना मिळतच असते. असो.


वसू म्हणजे अष्टवसु. आठ दिशांचे दिक्पाल. महाभारतातले भीष्मपितामह हेही वसूच. महाभारताचा सारांश मी अभंगवृत्तात जुळवायचा पण उपद्व्याप केलेला आहे. त्यात वसूंची ती कहाणी अशी आहे –

राजा जन्मेजया । तुझा हा वारसा । कुरुकुळाचा बा । लौकिकाचा ॥
चांद्रवंशी राजे । भरतादि यांचा । शतकोत्तरी हा । इतिहास ॥
आरंभ करीतो । राजा प्रतीपाच्या । कारकीर्दीहूनी । तेच बरे ॥
राजा प्रतीपाचे । वय खूप झाले । तरी वंशदीप । नव्हताच ॥
तपाचरणाचा । निश्चय करूनी । गंगेचे किनारी । राजा गेला ॥
स्वर्गात तेवेळी । स्वतः ब्रम्हदेव । यांचे प्रवचन । चालूं होते ॥
प्रतीपाआधीचा । राजा महाभीष । श्रोतृवृंदामध्ये । बसलेला ॥
अचानक त्याचे । लक्ष गंगेकडे । गेले झाले चित्त । विचलित ॥
ढळला तो आत्मा । शिरला प्रतीप । राजाच्या राणीच्या । गर्भामध्ये ॥
प्रतीपाचा पुत्र । शंतनू जन्मला । राजास जाहले । समाधान ॥
महाभीषाच्या त्या । आत्म्याचा मागोवा । करीत गंगाही । तिथे आली ॥
प्रतीपास तिने । म्हटले तुझ्या ह्या । मुलावर आहे । जीव माझा ॥
ह्याचे जन्माचेही । खूप काळ आधी । ऋणानुबंध तो । जडलेला ॥
कांही वर्षानी मी । परत येईन । ऋणानुबंधास । उजळाया ॥
धरेस येण्याचा । गंगेचा तो बेत । अष्टवसूना कीं । समजला ॥
त्यानाही धरेस । येणे भाग होते । प्रमाद काहीसा । झाला होता ॥
गंगेकडे आले । सारे अष्टवसू । मदत मागण्या । तिची कांही ॥
उषःकालचा जो । संधिवसु त्याचे । नांव की प्रभास । आहे त्याने ॥
कारण गंगेस । सांगताना सारी । पूर्वपीठिकाही । निवेदिली ॥
त्याच्या पत्नीची ना । एक सखी होती । पृथ्वीतलावरी । जिवलग ॥
स्वर्गलोकातील । गाय सुरभीच्या । दुधाची महती । गप्पांमधें ॥
सुरभी येईल । पृथ्वीतळी काय । आग्रह सखीने । खूप केला ॥
आम्ही अष्टवसू । सुरभीचे संगे । तेव्हां गेलो होतो । पृथ्वीवरी ॥
स्वर्ग सोडूनीया । आम्ही गुप्तपणे । जरी पृथ्वीवरी । गेलो खरे ॥
गुरु वसिष्ठानी । मन सामर्थ्याने । जाणूनी आम्हास । शाप दिला ॥
पृथ्वीवरी तुम्हा । जन्म घेणे प्राप्त । तेंच प्रमादाचें । प्रायश्चित्त ॥
अष्टवसू आम्ही । इंद्राचे सेवक । स्वर्ग सोडला तो । प्रमादचि ॥
वसिष्ठांचा शाप । नाहीच टळेल । पुन्हा आम्हा मुक्ति । केव्हा ठावे ॥
अष्टवसूंची ती । व्यथा समजून । गंगेने दिधले । आश्वासन ॥
पृथ्वीतलावर । असताना तुम्हां । जन्म मी देईन । मुक्ती सुद्धा ॥
प्रतीपानंतर । राजमुकुट तो । शंतनूचे शिरी । विराजला ॥
गंगेच्या किनारी । रपेट करतां । नजरेस आली । रूपवती ॥
शंतनूने तिला । मागणी घातली । तिने परि अट । सांगितली ॥
मी कोण सवाल । नाही करायचा । नाही विचारावी । माझी कृत्ये ॥
अट ही मोडाल । त्याक्षणी तुम्हास । सोडावे लागेल । मज पहा ॥
शंतनू दीवाना । अट मानूनीया । केली त्याने तिज । पट्टराणी ॥
तीच गंगा होती । दरवर्षी एका । वसूस दिधला । जन्म तिने ॥
जन्मल्या मुलाला । गंगेत सोडावे । ऐसा घाट तिने । चालवीला ॥
सात वर्षाअंती । सप्तवसू ऐसे । तिने केले मुक्त । निश्चयाने ॥
राजपुत्र ऐसे । गंगार्पण होतां । शंतनू मुकाट । दृश्य पाहे ॥
आठव्याचे वेळी । नाही राहवले । शंतनूने तिज । प्रश्न केला ॥
उत्तर न देता । गंगा गंगेमध्ये । विलीन जाहली । क्षणैकात ॥
तान्हुला घेऊनी । शंतनू महाली । परतला त्याचे । नांव भीष्म ॥

महाभारतात आठी वसूंची नांवें सांगणारा श्लोक असा आहे –

धरो धृवश्च सोमश्च अहश्च अनिलोऽनलः ।
प्रत्यूषश्च प्रभासश्च वसवः अष्टौ प्रकीर्तिताः ॥

गीतेच्या दहाव्या अध्यायात “वसूनां पावकश्चास्मि” असा उल्लेख आहे. पावक म्हणजे अग्नि. अग्नीची दिशा आग्नेय.

वसुधा ह्या शब्दाबद्दल माझे स्नेही श्री. प्रकाश कुलकर्णी ह्यांनी सांगितलं कीं, वसुधा ह्या शब्दाचं सूत्र “वसुभिः धार्यते अतः” असं न घेतां “वसून् धारयति अतः वसुधा” असं पण मानतात. आणि असं सूत्र घेताना, वसु ह्या शब्दाचा दुसरा अर्थ, वसु म्हणजे धन, हा घेतात. “(निरनिराळ्या प्रकारचे) धन धारण करते, ती वसुधा”. हाही अर्थ मोहक आहे ना ? असो.

एव = च
कुटुम्बकम् = कुटुंब

सुभाषिताचा एकूण अर्थ असा होतो –
हा आपला, किंवा हा दुसरा (परका) असा विचार लहान मनाच्या लोकांचा असतो. उदार मनाच्या लोकाना तर सगळी पृथ्वीच एक कुटुम्ब.

हें सुभाषित खरं तर, भारताच्या आंतर्राष्ट्रीय धोरणाचं द्योतक आहे किंबहुना असायला हवं. असा विचार मी मांडला. तेव्हां श्री. कुलकर्णीनी अशी पण माहिती पुरवली कीं, वसुधैव कुटुम्बकम् हे शब्द आपल्या पार्लमेंटच्या प्रवेशद्वारावर कोरलेले आहेत !

आपणा भारतीयांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे तर हें सुभाषित ! चला, पाठ करायचं ना ?

अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ॥

पाठ संपविण्यापूर्वी थोडा स्वाध्याय ?
(१) ह्या सहा पाठात मिळून ब-याच शब्दांची ओळख झाली. या सर्व शब्दांमधे कितीतरी शब्द असे आहेत, कीं ते नेहमी जसेच्या तसेच राहतात. जसे पहिल्या पाठात आलेले “एव” आणि “च”. अशा बदल न होणा-या शब्दाना अव्यय म्हणतात. ही अव्यये क्रियाविशेषणे, संबंधसूचक, उद्गारवाचक अशी असतात. अशा सर्व अव्ययांचीच स्वतंत्र जंत्री बनवली तर एक वेगळ्या प्रकारचा शब्दकोश तयार होईल. पहा बरं, बनवून.

(२) मग इतर शब्द म्हणजे नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे. यांच्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या जंत्र्या बनवायच्या !

शुभमस्तु ।
-o-O-o-

चला संस्कृत शिकूं या ! पाठ – ५

चला संस्कृत शिकूं या !
पाठ – ५

शब्दसंग्रह ५

अ. क्र. मराठी संस्कृत
1 चांगला माणूस, सज्जन सुजनः
2 नाही
3 जातो याति
4 वैर, शत्रुता वैरम्
5 दुसरा परः
6 हित हितम्
7 दुसऱ्याचे हित परहितम्
8 मग्न निरतः
9* दुसऱ्याच्या हितात मग्न परहितनिरतः
10 विनाश विनाशः
11 वेळ काल:
12* विनाशाच्या वेळी विनाशकाले
13 सुद्धा अपि
14 कापण्याने छेदे
15 चंदन चन्दनम्
16 झाड, वृक्ष तरुः
17* चंदनाचा वृक्ष चन्दनतरुः
18 सुवास देतो सुरभयति
19 तोंडाला, पात्याला मुखम्
20 कुऱ्हाडीच्या कुठारस्य

सुजनः, न आणि अपि हे शब्द आधीच्या शब्द संग्रहात येऊन गेलेले आहेत.

इथे  ‘परहितनिरतः’, ‘विनाशकाले’ आणि ‘चन्दनतरुः’ हे तीन सामासिक शब्द आहेत.


परहितनिरतः ह्या नवव्या सामासिक शब्दात ‘पर’, ‘हित’ आणि निरत ही तीन पदे आहेत.

प्रथम ‘परहितम्’ हा जो सातवा  शब्द तोही सामासिक आहे. त्याचा विचार करूं.

परहितम् म्हणजे दुसऱ्याचे हित.  संस्कृत मध्ये “परस्य हितम्”. इथे परस्य हा शब्द “पर” ह्या शब्दाची षष्ठी विभक्ती आहे. मिळून परहितम् = परस्य हितम् हा षष्ठी तत्पुरुष समास झाला.

आता  परहितनिरतः या भागाकडे  वळूं. परहितनिरतः म्हणजे “दुसऱ्याच्या हितात मग्न” संस्कृतमध्ये परहिते  निरतः. इथे परहिते  हा शब्द  परहितम् ची  सप्तमी विभक्ति. मिळून परहितनिरतः = परहिते  निरतः हा सप्तमी-तत्पुरुष समास झाला.

विनाशकाले म्हणजे विनाशाच्या वेळी. विनाशकाले हा शब्द “विनाशकाल” ह्या शब्दाची सप्तमी विभक्ति आहे. संस्कृत मध्ये  विनाशकालः म्हणजे विनाशस्य कालः. इथे विनाशस्य हा शब्द “विनाश” ह्या शब्दाची षष्ठी विभक्ति आहे. मिळून  विनाशकालः म्हणजे विनाशस्य कालः हा षष्ठी-तत्पुरुष समास झाला.


सामासिक शब्द हे नवीन स्वतंत्र शब्द असतात. त्यांची स्वतंत्रपणे विभक्तीरूपे पण होतात. म्हणून सामासिक शब्दांचा विग्रह करण्या आधी सामासिक शब्दाच्या प्रथमा विभक्तीच्या एकवचनाचे रूप लक्षात घ्यायचे. मगच विग्रहाला सुरवात करायची.


चन्दनतरुः हा शब्द देखील प्रथमा विभक्ति एकवचनीच आहे. चन्दनम् आणि तरुः ही त्यातील  दोन पदे  आहेत. चन्दनतरुः म्हणजे  चांद चंदनाचे झाड. संस्कृतमध्ये  चन्दनस्य तरुः. चंदनस्य  हा शब्द चन्दनम् ह्या शब्दाची षष्ठी विभक्ती आहे. मिळून चन्दनतरुः = चन्दनस्य तरुः हा षष्ठी-तत्पुरुष समास झाला.


खरं तर शब्द संग्रहातला “सुजनः” हा सुद्धा सामासिक शब्द आहे.  त्यात ‘सु’ आणि ‘जनः’ ही दोन पदे आहेत.  संस्कृत मध्ये ‘सु’ हे  उपपद, सुष्ठु म्हणजे चांगले ह्या अर्थाने वापरतात. मिळून  सुजनः म्हणजे  सुष्ठु जनः हा उपपद-तत्पुरुष समास होतो.


एकूण आपण तीन प्रकारचे समास पाहिले – षष्ठी-तत्पुरुष, सप्तमी-तत्पुरुष आणि उपपद-तत्पुरुष. अर्थातच हे तत्पुरुष ह्या प्रकारच्या समासाचे पोट प्रकार आहेत.

सामासिक शब्दांचा अर्थ समजण्या साठी  त्यांचा  विग्रह केला पाहिजे, हें ही आपल्याला  ध्यानात  ठेवले पाहिजे.

चला आता आपण नेहमीप्रमाणे सुभाषिताचे शब्द जुळवू.


अभ्यास  ५

 

अ. क्र. मराठी संस्कृत
1 चांगला माणूसनाहीजातोवैर __________  __________  _________
2 दुसऱ्याच्या हितात मग्न __________  __________  ________
3 विनाशाच्या वेळीसुद्धा __________  __________  ________
4 कापण्यानेसुद्धाचंदनाचा वृक्ष __________  __________  ________
5 सुवास देतो ________  __________  _________
6 पात्यालाकुऱ्हाडीच्या ________  __________  _________


सुजनः आणि  न ह्यांचा संधि “सुजनो न” असा होईल.


तसेच  परहितनिरतः आणि  विनाशकाले ह्यांचा संधि  परहितनिरतो विनाशकाले असा होईल. संधि होण्याच्या ह्या प्रकाराचा उल्लेख आधी पण आलेला आहे.

तिसऱ्या ओळीत  आपल्याला  विनाशकाले आणि अपि हे शब्द मिळतील. त्यांचा  संधि  होताना अपि मधील अ चा लोप होतो. पण तिथे अ आहे हे दाखविण्यासाठी अ च्याजागी “ऽ” हें चिन्ह  लिहायचे. ह्या  चिन्हाला अवग्रह म्हणतात. तेव्हा   विनाशकाले आणि अपि ह्यांचा  संधि विनाशकालेऽपि असा लिहायचा.

जर पहिल्या शब्दाच्या शेवटी ए असेल आणि पुढील शब्दाच्या सुरवातीला  अ असेल तर त्यांचा मिळून उच्चार करताना ‘अ’ चा उच्चार होत नाही, हें उच्चार करून पाहताना सुद्धा आपल्या लक्षात येईल.

चवथ्या ओळीत छेदे आणि अपि ह्यांचा संधि देखील छेदेऽपि असा होईल.

एकूण सुभाषित तयार होईल तें असें –

सुजनो न याति वैरम् परहितनिरतो विनाशकालेऽपि ।

छेदेऽपि चन्दनतरुः सुरभयति मुखं कुठारस्य ॥


सुभाषिताचा अर्थ लक्षात आला असला तरी चांगल्या मराठीत लिहिलेला बरा, नाही कां ?

दुसऱ्याच्या हितात मग्न (असणारा) चांगला माणूस विनाशाच्या वेळी सुद्धा वैर धरत नाही. (जसे) चंदनाचे झाड कुऱ्हाडीच्या पात्याला सुद्धा सुवासच देते.

छान आहे ना सुभाषित ? मग कराल ना पाठ ?


शुभमस्तु |

-o-O-o-


चला संस्कृत शिकूं या ! पाठ – ४

चला संस्कृत शिकूं या !
पाठ –  

शब्दसंग्रह 

अ. क्र. मराठी संस्कृत
1 उद्योगीपणाने उद्यमेन
2 खरंचकेवळ हि
3 साध्य होतात सिद्ध्यन्ति
4 कार्ये कार्याणि
5 नाही
6 मन मनः
7 रथांनी रथैः
8* मनोरथांनी, स्वप्नांनी मनोरथैः
9 झोपलेल्या सुप्तस्य
10 सिंहाच्या सिंहस्य
11 प्रवेश करतात प्रविशन्ति
12 तोंडात मुखे
13 हरणे मृगाः

“उद्यम:” असा शब्द पाठ २ मध्ये पण होता. इथे तो “उद्यमेन” असा आहे. पाठ २ मध्ये अर्थ “उद्योगीपणा” असा होता. इथे अर्थ “उद्योगीपणाने” असा हवा आहे. “उद्यम:” आणि “उद्यमेन”

हे दोन्ही शब्द “उद्यम” ह्या शब्दाची विभक्तीरूपे आहेत. नामे, सर्वनामे, विशेषणे यांचा वाक्यात उपयोग करताना त्यांची विभक्तीरूपे वापरली जातात. पाठ १ व २ मध्ये “देव” ह्या शब्दाची “देव” आणि “देव:” अशी रूपे होती व ती संबोधन आणि प्रथमा विभक्तींची होती असा खुलासा तेव्हां केला होता. इथे “उद्यमः” आणि “उद्यमेन ही उद्यम ह्या शब्दाची प्रथमा आणि तृतीया विभक्तींची रूपे आहेत. ज्या व्यक्तीरवी किंवा ज्या उपकरणाच्या सहाय्याने काम व्हायचे त्याची आपण तृतीया वापरतो(७) आणि (८) क्रमांकाचे शब्द सुद्धा तृतीया विभक्तीतच आहेत.

(१०) वा “सिंहस्य” हा शब्द षष्ठी विभक्तीचा आहे. म्हणून त्याच्याशी विशेषणाचा संबंध असणारा “सुप्तस्य” हा शब्द सुद्धा षष्ठी विभक्तीत आहे.


१२ वा शब्द सप्तमी विभक्तीचा आहे. ह्या विभक्तीने आत मध्ये वर खाली असे स्थान दर्शक अर्थ मिळतात.


नामे, सर्वनामे, विशेषणे यांची विभक्तीरूपे एकवचन द्विवचन बहुवचन ह्यामुळे सुद्धा वेगवेगळी होतात.


नामे, सर्वनामे, विशेषणे यांच्याप्रमाणेच क्रियापदाच्या मूळ धातूंची  वेगवेगळी रूपे होतात. ती काळ, अर्थ, पुरुष,  एकवचन द्विवचन बहुवचन ह्यानुसार बदलतात.

आतापर्यंतची सगळी वाक्ये वर्तमानकाळातली होती. आपली संस्कृत व्याकरणाची माहिती बेताबेताने पुढे सरकेल हा विचार सुभाषिते निवडताना नक्कीच मनात ठेवलेला आहे.


चांगल्या चांगल्या सुभाषितांची अर्थासह माहिती व्हावी हा मुख्य उद्देश धरलेला आहे. व्याकरणाची माहिती सध्या तरी माहिती असावी म्हणून आहे.


ह्या सुभाषितात एकच संधि आहे.

(6) + (7) = (8) मनः + रथैः = मनोरथैः

तथापि इथे दोन शब्दांचा संधि होऊन एक सामासिक शब्द बनलेला आहे.

समास हा शब्द सुद्धा सम् + आस: = समास: असा बनला आहे. सम् ह्या उपपदाचा अर्थ “मिळून”, “एकत्रित” असा असतो. आणि आस: म्हणजे “बसणे”

“समासः” असा व्याकरणाचा शब्द सुद्धा तर्कशुद्धपणे बनलेला आहे. हेंच तर संस्कृत भाषेच कौतुक आहे.
“सम्” हे जसे उपपद आहे, तसे प्रविशन्ति ह्या शब्दात “प्र हे  सुद्धा उपपद आहे. प्रत्येक उपपदाचा सुद्धा विशिष्ट अर्थ असतो. ते ओघाने येईलच.
तूर्तास आपण आपल्या नेहमीच्या अभ्यासाकडे वळू.

अभ्यास 

दिलेल्या शब्दसंग्रहातील शब्द वापरून संस्कृत शब्दांची जुळणी करा.

अ. क्र. मराठी संस्कृत
उद्योगीपणाने, च, साध्य होतातकार्ये __________  __________  _________
नाहीमनोरथांनी __________  __________  ________
नाहीखरंच, झोपलेल्या, सिंहाच्या __________  __________  ________
प्रवेश करतात, तोंडात, हरणे __________  __________  ________


शब्दसंग्रहात “नाही” हा शब्द एकदाच आहे. इथे तो दोनदा वापरायचा आहे.

शब्दसंग्रहात “हि” ह्या शब्दाचे दोन अर्थ दिले आहेत. आपण ठीकपणे वापरलाच.

नेहमीप्रमाणे (१) आणि (२) पहिल्या ओळीत व (३) आणि (४) दुसऱ्या ओळीत लिहिले, किं सुंदर सुभाषित तयार होते. अर्थ समजला असेलच. तरी पण चांगल्या मराठीत लिहून काढावा.


सुभाषित असं होईल –

उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः ।

न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः ॥



बऱ्याच सुभाषितात हे असं असतं – एकदा सदाचाराचा नियम मांडून तो उदाहरणाने स्पष्ट केलेला असतो. किंवा उदाहरण देऊन त्यावरून निष्कर्ष मांडलेला असतो. किती समर्पक उदाहरणं निवडतात ना, सुभाषितकार ? आणि हें सगळं केवळ दोन ओळीत, त्या देखील काव्यमय ! वाटणारच ना पाठ करावंसं !


शुभमस्तु |

-o-O-o-


चला संस्कृत शिकूं या ! पाठ – ३

चला संस्कृत शिकूं या !
पाठ – ३

शब्दसंग्रह ३
अ. क्र. मराठी संस्कृत
1 शरद ऋतूमध्ये शरदि
2 नाही, नाहीत
3 पाऊस पडतो वर्षति
4 गरजतो गर्जति
5 पावसाळ्यात, वर्षा ऋतूत वर्षासु
6 आवाज न करणारा नि:स्वनः
7 ढग मेघः
8* आवाज न करणारा ढग निःस्वनो मेघः
9 नीच नीचः
10 बोलतो, बडबड करतो वदति
11* नीच बडबड करतो नीचो वदति
12 करतो कुरुते
13 सज्जन सुजनः
14 करतो करोति
15 केवळ, च एव
16* करतोच करोत्येव

१५ वा शब्द नवा नाहीये. पहिल्या शब्दसंग्रहातच तो होता. इथे सोयीसाठी पुन्हा दिलेला आहे.

ह्या पाठात तीन संधि आहेत.

सन्धि असलेल्या शब्दांशी * ही खूण आहे.

(6) + (7) = (8) नि:स्वनः + मेघः = निःस्वनो मेघः

(9) + (10) = (11) नीचः + वदति = नीचो वदति

(14) + (15) = (16) करोति + एव = करोत्येव


पहिल्या दोन सन्धीमध्ये दोन शब्द मिळून एक शब्द झालेला नाहीये. फक्त विसर्गाचा “ओ” झालेला आहे.
निःस्वन् + अः –> निःस्वन् + ओ = निःस्वनो
नीच् + अः –> नीच् + ओ = नीचो

तिसरा सन्धि असा झाला आहे पहा –>  करोति + एव = करोत् + इ + एव = करोत् + य् + एव = करोत्येव

पहिल्या शब्दाच्या शेवटी “इ” आहे. त्यात दुस-या शब्दाच्या सुरवातीचा स्वर “ए” मिसळताना, “इ” चा आधी “य्” झाला. म्हणजे “ति”मधे “त् + इ” होते. त्याचा “त्य्” त्यात “ए” मिसळला. सर्व मिळून “त्ये” झाला.

ह्या सगळ्या खुलाशानं बावरूं नका. स्वतःशीच “करोति एव”, “करोति एव” असं जरा जलद म्हणून पहा. आपोआप “करोत्येव” होईल. पाणिनी मुनींसारख्या वैय्याकरण्यांची महत्ता हीच कीं जें सहजपणानं सुद्धा होतं, त्याचेच त्यांनी नियम बनविले. अशा संस्कारामुळं ज्या भाषेत समाजच सुसंस्कृत करण्याचं सामर्थ्य आलं, त्या भाषेलाही “संस्कृत” असं नांव मिळालं ! म्हणूनच तर असं विश्वासानं म्हणता येतं, कीं संस्कृत इतकी संस्कारक्षम भाषा दुसरी कुठलीच नाहीये.


अभ्यास ३
शब्दसंग्रहातील शब्द “मराठी” रकान्यात दिलेल्या क्रमाने “संस्कृत” रकान्यात भरा.


अ. क्र. मराठी संस्कृत
1 शरद ऋतूमध्ये, नाही, पाऊस पडतो, गरजतो ____  ______  _____  _____
2 पाऊस पडतो, पावसाळ्यात, आवाज न करणारा, ढग __________  __________  ________
3 नीच, बडबड करतो, नाही, करतो __________  __________  ________
4 नाही, बोलतो, सज्जन, करतोच __________  __________  ________


शब्दसंग्रहात “करतो” ह्या अर्थाचे दोन शब्द दिले आहेत – “करोति” आणि “कुरुते”. दोन्ही शब्द समानार्थी आहेत. मराठीत जिथे “करतो” म्हटले आहे, तिथे कोणताही एकच शब्द दोनदा वापरला तरी वाक्य बरोबरच होईल. पण अभ्यासासाठीच्या तक्त्यात एके ठिकाणी नुसतं “करतो” आणि दुसरे ठिकाणी “करतोच” असं दिलं आहे. त्यावरून कुठला शब्द कुठं वापरायचा तें समजेलच.

संस्कृत रकान्यातले दोन-दोन शब्दसमुच्चय एकेका ओळीत लिहिले कीं पुढील सुभाषित तयार होईल !!


शरदि न वर्षति गर्जति वर्षति वर्षासु निःस्वनो मेघः ।

नीचो वदति न कुरुते न वदति सुजनः करोत्येव ॥


“शरदि न वर्षति गर्जति वर्षति वर्षासु..” अशी शब्दरचना जुळवून सुभाषितकारानं कसा सुंदर अनुप्रास जमवला आहे, ना ? सुभाषितांमध्ये अशी एक सहजच लय असते. त्यामुळं ती पाठ करायला पण सोपी असतात. मग, करून टाका पाठ ! कसें ?

अर्थ देखील समजला ना ? हवं तर मराठीत जसा बरा वाटेल तसा लिहून टाका.

तुम्ही म्हणाल, मी प्रत्येक पाठाच्या शेवटी “पाठ करून टाका” असं सांगतोय्. पण चांगलं आहे ना ! जितकं जास्त संस्कृत मुखोद्गत होईल, तितकं जास्त तुम्हाला तुमच्या बोलण्या-वागण्यात वापरतां येईल, हो, वागण्यात सुद्धा. संस्कृत शिकणं म्हणजे नुसती नवीन भाषा शिकणं असं नाहीच आहे. कितीतरी सुसंस्कृत विचारांचं पण ज्ञान मिळतं, नाही कां ?

शुभमस्तु |

-o-O-o-



चला संस्कृत शिकूं या ! पाठ – २

चला संस्कृत शिकूं या !
पाठ – २
शब्दसंग्रह २
अ. क्र. मराठी संस्कृत
1 उद्योगीपणा उद्यमः
2 साहसीपणा साहसम्
3 धैर्य धैर्यम्
4 बुद्धि बुद्धिः
5 शक्ति शक्तिः
6 पराक्रम पराक्रमः
7 सहा षट्
8 हे एते
9* हे सहा षडेते
10 जेथे यत्र
11 आहेत, असतात वर्तन्ते
12 तेथे तत्र
13 देव देव:
14 सहाय्यकारी सहाय्यकृत्

७, ८ व ९ ह्या शब्दांवरून लक्षात येईल कीं, “षट्” आणि “एते” हे शब्द एकापाठोपाठ म्हणताना, षट् ह्या पहिल्या (७) क्रमांकाच्या शब्दाच्या शेवटी असलेल्या “ट्” ह्या व्यंजनात एते ह्या (८) क्रमांकाच्या दुस-या शब्दाच्या सुरवातीच्या “ए” ह्या स्वरात स्वाभाविकपणे  मिसळून दोन्ही शब्द मिळून एकच शब्द असल्यासारखा “षडेते” असा (९) क्रमांकाच्या शब्दाचा उच्चार होतो.

जेव्हां दोन शब्द जोडीने येतात आणि पहिल्या शब्दाचें शेवटचे व्यंजन किंवा स्वर, दुस-या शब्दाच्या सुरवातीच्या स्वर किंवा व्यंजन याच्यात मिळून दोन्ही शब्दांचा मिळून एकत्रित शब्द होऊं शकतो, त्याला सन्धि म्हणतात


तसे तर पहिल्या पाठात सुद्धा तीन संधि होते.


1.  त्वम् + एव = त्वमेव
2.  बन्धुः + च = बन्धुश्च
3. शुभम् + अस्तु = शुभमस्तु

सन्धि हे स्वाभाविकपणे होतात. त्यामुळं, त्याचा बाऊ करायचं अजिबात कांहीं कारण नाहीं.

(१३) व्या क्रमांकाचा देवः हा शब्द खरं तर नवा नाही. पहिल्या पाठात पण तो होता. फरक इतकाच आहे, कीं तिथे तो “देवा”, “हे देवा” असा संबोधन विभक्तीचा होता. इथे तो वाक्यातील कर्त्याच्या प्रथमा विभक्तीचा आहे. संबोधन विभक्तीत विसर्ग येत नाही. प्रथमा विभक्तीत विसर्ग येतो. हा फरक आहे.

हें सर्व माहितीसाठी आहे. आपल्याला कशाचा अर्थ समजून घ्यायचा आहे, तें तर खालील तक्त्यावरून समजेलच. पहिल्या पाठामधे केलं, तसं “मराठी” ह्या रकान्यात ज्या क्रमानं शब्द दिले आहेत, त्या क्रमानं शब्दसंग्रहातील शब्द “संस्कृत” ह्या रकान्यात भरायचे


अभ्यास २

 

No. मराठी संस्कृत
1 उद्योगीपणा, साहसीपणा, धैर्य __________  __________  _________
2 बुद्धि, शक्ति, पराक्रम __________  __________  ________
3 हे सहा, जेथे, असतात __________  __________  ________
4 तेथे, देव, सहाय्यकारी __________  __________  ________


(१) आणि (२) मधील शब्द एका ओळीत व (३) आणि (४) मधील शब्द दुस-या ओळीत असं लिहिलं, कीं खालीलप्रमाणे सुभाषित तयार होईल.


 


उद्यमः साहसं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः ।

षट् एते यत्र वर्तन्ते तत्र देवः सहाय्यकृत् ॥

 

 

 

अर्थ देखील समजला ना ? हवं तर मराठीत जसा बरा वाटेल तसा लिहून टाका. आणि मग काय, पाठही करून टाकायचं. भाषणामधे वगैरे अशी सुभाषितं पेरतां आली, तर भाषण रुबाबदार होईलच कीं नाही ?


शुभमस्तु |

-o-O-o-


चला, संस्कृत शिकूं या ! – पाठ १

चला, संस्कृत शिकूं या ! – पाठ १ 

कांहीं शब्दांची ओळख – शब्दसंग्रह १

अ. क्र. मराठी संस्कृत
1 तूं त्वम्
2 एव
3 तूंच त्वमेव
4 आई माता
5 आणि
6 वडील पिता
7 भाऊ बन्धुः
8 मित्र, सखा सखा
9 विद्या विद्या
10 धन, द्रव्य द्रविणं
11 सर्व, सर्वकांहीं सर्वं
12 माझा, माझी, माझें मम
13 देवा, हे देवा देव


अभ्यास १
वरील शब्दसंग्रह वापरून खालील पदें तयार करा. “मराठी” ह्या रकान्यात ज्या क्रमाने शब्द दिले आहेत, त्यांचे संस्कृत शब्द त्याच क्रमाने “संस्कृत” या रकान्यात लिहायचे, इतकंच.  –

अ. क्र. मराठी संस्कृत
1 तूंच, आई, आणि, वडील, तूंच ___ ____ ___  ____ ____
2 तूंच, भाऊ, आणि,  तूंच, सखा __  ____ ___  ___ _____
3 तूंच, विद्या, आणि, धन, तूंच ____ ____  ____ ___  ___
4 तूंच, सर्वकांही, माझें, देवा, हे देवा ____ ______  ___ ___ ____


पहा बरं, आपल्या सर्वांच्या परिचयाची एक प्रार्थना तयार झाली ना !
आणि प्रार्थनेचा अर्थही समजला ना ? हवं तर, मराठीत तो कसा लिहिला जाईल तसा पुन्हा लिहून टाकावा.

ज्याना ही प्रार्थना पाठ आहे, त्यांना एक फरक जाणवेल. तो म्हणजे, वर तिस-या ओळीत बनतंय् “बन्धुः च”.
परिपाठ मात्र आहे, “बन्धुश्च”
एवढ्यानं गोंधळायला होऊं नये.
“बन्धुः + च” मिळून “बन्धुश्च” हा संधि झाला आहे, इतकंच. आणि तें छानच आहे.

प्रत्येक ओळीच्या शेवटी एक उभी रेघ (।) काढायची. ती रेघ म्हणजे संस्कृतमधला पूर्णविराम आहे. किंवा काव्यातल्या ओळीच्या शेवटीसुद्धा अशी रेघ वापरली जातेच. आणि कडव्याच्या शेवटी दोन उभ्या रेघा (॥).

एकूण प्रार्थना अशी होते.

त्वमेव माता च पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देव देव ॥
ज्याना माहीत नव्हती, किंवा ज्यांची पाठ नाही, त्यांनी पाठ करून टाकावी. चांगली प्रार्थना आहे.
कुणाच्या जाति, धर्म, पंथ अशा कुठल्याच भावनांशी विसंगत असण्याचाही प्रश्न नाहीय्ये.
पाठ केली, कीं संस्कृत शिकायला सुरवात केली, म्हणजे काय केली, तें नुसतं म्हणून दाखवून नव्हे, तर अर्थ पण सांगतां येईल, ना ?
शुभमस्तु (शुभम् + अस्तु) ।
मंगलमय, कल्याणकारी शुभम्
असूं दे, होवो अस्तु


-o-O-o-