पायऱ्यानिशी संस्कृत (९) – स्वरसंधि

आधीच्या (३) ते (८) या पाठातून संस्कृत वाक्यांत जें शब्द असतात, त्यांची

  1. सुबन्त – यांत नामें, सर्वनामें विशेषणें यांची लिंग-विभक्ती-वचनानुसार रूपें समाविष्ट होतात.
  2. तिङन्त – क्रियापदें जी धातूंची लकार, पुरुष, वचन यानुसार रूपें होतात ती समाविष्ट होतात.
  3. अव्ययें
  4. कृदन्त – यांत धातूंना कृत्-प्रत्यय लागून होणारे शब्द व (होत असल्यास) त्यांची सुबन्ते समाविष्ट होतात.

अशा सगळ्याच प्रकारच्या शब्दांची ओळख झाली. तेव्हां आपल्याला संस्कृत वाक्ये समजून घ्यायला अडचण नसावी. पण गंमत अशी आहे कि बऱ्याचदा संस्कृत वाचायलाच अवघड वाटतं. उदा. गीतेतील (१२’५) मधील ही पहिली ओळ पहा क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम्  इथे एक अवग्रह सोडला तर, सगळे शब्द जोडूनच लिहिले आहेत. (१२’१२) मधील दुसऱ्या ओळीत तर अवग्रह देखील नाही ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम्

या दोन्ही ओळीत वेगवेगळे शब्द आहेत. ते कोणते आहेत, ते जर आपण समजूं शकलो, तर संस्कृत वाचणे आणि समजून घेणे, सोपे होणार.

इथे क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् = क्लेशः अधिकतरः तेषाम् अव्यक्त-आसक्त-चेतसाम् असे शब्द आहेत.

  • त्यापैकी अव्यक्त, आसक्त, चेतसाम् हे तीन्ही शब्द एकाच सामासिक शब्दाची पदे आहेत.

तसेच ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् = ध्यानात् कर्म-फल-त्यागः त्यागात् शान्तिः अनन्तरम्  

  • इथे देखील कर्म, फल, त्यागः ही एकाच सामासिक शब्दाची पदे आहेत. त्यामुळे ती जोडूनच लिहायची.

सामासिक शब्दांची पदें कितीही असली तरी ती सर्व मिळून एकच शब्द तयार होतो. म्हणून तो एकच शब्द म्हणून लिहायचा, हें ठीक आहे. पण पदें जोडून लिहिताना देखील ती कशी जोडायची त्याचं एक उदाहरण म्हणून अव्यक्त आणि आसक्त ही जोडून अव्यक्तासक्त असं केलंय, इकडे लक्ष देऊं.

असं पहा कि इथे अव्यक्त आणि आसक्त हे शब्द एकापाठोपाठ आहेत. तेव्हां ते जर लगबगीनं म्हणूं गेलो तर सहजपणेच त्यांचा उच्चार अव्यक्तासक्त असा होतो. अवश्य म्हणून पहा. संस्कृत व्याकरणकारांनी ऋषीमुनींनी हे उच्चार असे कां होतात, याचा अभ्यास केला. इथे अव्यक्त मधील क्त आणि लगेच येणारा आ मिळून क्ता झाला. आणखीन बारकाईनं बघायचं तर क्त-मध्ये क् त् अ आहेत. म्हणजे क्त या एका ध्वनीमधे क् त् अ हे ध्वन्यंश आहेत. खरं तर आपण लिपी शिकतो, वर्णमाला शिकतो, तेव्हां ध्वन्यंशच शिकतो. ध्वन्यंश म्हणजे वर्ण.

बरेच वर्ण असे असतात कि एकापाठोपाठ आले कि ते सहज एकमेकात मिसळून जातात. वर्ण असे एकमेकात मिसळण्याला संधि किंवा संहिता म्हणतात. गणपत्यथर्वशीर्षात म्हटलंच आहे संहिता संधिः पुढे सैषा गणेशविद्या असं देखील म्हटलंय. इथे पण पहा, सैषा हा काय शब्द आहे. तो एकच शब्द नाहीये. सा एषा असे दोन शब्द आहेत. सा-मधे स् आणि आ हे वर्ण आहेत. ह्या आ पुढे वर्ण आहे ए. स् आ आणि ए मिळून लगबगीचा उच्चार होतो सै. संधि किंवा संहिता समजणं म्हणजे, सा एषा, ती ही, गणेशविद्या आहे बरं !

संधि समजून घेणं ही गणेशविद्या आहे, म्हणून ते समजून घ्यायचे असंही समजायचं कारण नाही. आपण जें कांही संस्कृत लिहितो, जें कांही मराठी सुद्धा लिहितो, तेव्हा आपण उच्चारच लिहीत असतो. त्यामुळे

  1. सामासिक शब्दांचा उच्चार करतांना त्यांत सहजगत्या येणारे संधि सहजगत्या होतातच. त्यामुळे सामासिक शब्द लिहितांना जिथे संधि होतात, ते संधि करूनच लिहिले पाहिजेत.
  2. सुबन्ते तयार होताना सुद्धा प्रातिपदिकाना प्रत्यय लागून ती तयार होतात. तशी ती तयार होताना जर कुठले संधि सहजगत्या होत असतील तर ते तसेच लिहायला हवेत. उदाहरणार्थ जगत् या प्रातिपदिकाची तृतीया, चतुर्थी, पंचमी विभक्तींच्या द्विवचनाची रूपें भ्याम् हा प्रत्यय लागून होताना जगत् + भ्याम् = जगद्भ्याम् अशी सहजगत्याच त्-चा “द्” होऊन होतात.
  3. सोपसर्ग धातूंची तिङन्ते तयार होताना सुद्धा उपसर्ग आणि धातूचे तिङन्त यांचा जर सहजगत्या संधि होत असेल, तर तो तसा केलाच पाहिजे, म्हटला पाहिजे, लिहिला पाहिजे. उदा. स्था धातूचे लङ्-लकार, प्र. पु. ए. व. होते अतिष्ठत्. जर धातूबरोबर अति हा उपसर्ग देखील असेल, तर रूप अति + अतिष्ठत् मिळून अत्यतिष्ठत् असें ति + अ = त्य असा संधि होऊनच होईल.

सहजगत्या होणारे संधि केव्हां केव्हां केलेच पाहिजेत, त्याचा एक श्लोकच आहे.

संहितैकपदे नित्या नित्या धातूपसर्गयोः ।

नित्या समासे वाक्ये तु सा विवक्षामपेक्षते ।।

[अर्थ – एकपद होत असतांना, धातू(चे रूप) आणि उपसर्ग यांच्यात, आणि समासांत संहिता नित्य असावी (केलीच पाहिजे). वाक्य करतांना, बोलतांना, लिहितांना संधि करावासा वाटला तर करावा.]

संधि म्हणजे नेहमी दोन वर्णांचा मिळून उच्चार. त्यामधे एक पूर्ववर्ण आणि दुसरा उत्तरवर्ण.

  • क् त् अ आणि आ मिळून क्ता झालं असं म्हणताना खरं तर पूर्ववर्ण अ आणि उत्तरवर्ण आ हे एकमेकात मिसळले आहेत. ते दोन्ही स्वर आहेत.
  • स् आ आणि ए मिळून सै झाला, असं म्हणताना देखील पूर्ववर्ण आ आणि उत्तरवर्ण ए मिळून ऐ झालाय. आ आणि ए हे दोन्ही देखील स्वरच आहेत.
  • ही दोन्ही स्वरसंधीची उदाहरणे आहेत.

मुळात स्वर अ आ इ ई उ ऊ ऋ ॠ ऌ ॡ ए ऎ ओ औ असे १४ स्वर आहेत. कोणतेही दोन स्वर एकापाठोपाठ आल्यास त्यांचा स्वरसंधि होतो. पूर्ववर्ण आणि उत्तरवर्ण दोन्ही स्वर असले कि स्वरसंधि होतो. त्यामुळे स्वरसंधींचे १९६ प्रकार होतील. तथापि दीर्घ ॡ-च्या पुढे किंवा दीर्घ ॡ-च्या आधी, तो किंवा इतर कोणताही स्वर येऊन स्वरसंधि होण्याचे प्रकार नाहीतच, असें म्हणणें योग्य समजल्यास मूळ स्वर १३ च समजावे. तेव्हां स्वरसंधींचे प्रकार १६९ होतात.

प्रकार इतके १६९ होत असले तरी संस्कृतव्याकरणकारांनी बऱ्याच प्रकारांची एकसूत्रता लक्षात घेतली. जसे अ आ इ ई उ ऊ ऋ ॠ ऌ ॡ या स्वरांमधे ह्र्स्व-दीर्घ अशा जोड्या आहेत. प्रत्येक जोडीतील स्वर एकमेकांचे सवर्ण आहेत. अ आणि आ या जोडीचे अ-पुढे अ, अ-पुढे आ, आ-पुढे अ, आ-पुढे आ असे चार प्रकार होतात. या चारही प्रकारांत मिळून उच्चार आ असाच म्हणजे दीर्घ होतो. हें असं दीर्घ होणं प्रत्येक सवर्ण जोडीच्या बाबतीत होतं. “सवर्ण स्वरांचे संधि दीर्घ होतात” हा नियम(१). या नियमाने पांच जोड्यांचे प्रत्येकी चार प्रकार मिळून २० स्वरसंधींचा अभ्यास होऊन जातो.

सगळ्या प्रकारांची उदाहरणें मी देण्यापेक्षा, तो गृहपाठ समजावा.

अ आ यांच्यापुढे इ किंवा ई आल्यास ए(२) होतो आणि अ आ यांच्यापुढे उ किंवा ऊ आल्यास ओ(३) होतो. यात ८ प्रकार येतात.

ऋ ॠ या दोहोंचा नेहमी र्(४) हा व्यंजन वर्ण होतो. तसेच ऌ ॡ या दोहोंचा नेहमी ल्(५) हा व्यंजन वर्ण होतो. या नियमाचे, अ किंवा आ हे पूर्ववर्ण असल्यास ८ प्रकार होतात.  

अ आ यांच्यापुढे ए किंवा ऐ आल्यास ऐ(६) होतो आणि अ आ यांच्यापुढे ओ किंवा औ आल्यास औ(७) होतो. याचे देखील ८ प्रकार.

अशा रीतीने अ किंवा आ हे पूर्ववर्ण असतानाच्या स्वरसंधींचे एकूण २६ प्रकार झाले. (उत्तरवर्ण दीर्घ ॡ असण्याचे दोन प्रकार सोडले.)

सवर्णसंधीखेरीज इतरत्र म्हणजे इतर बारा स्वर उत्तरवर्ण असतांना

  1. इ किंवा ई पूर्ववर्ण असल्यास त्यांचा य्(८) होतो. यांचे २२ प्रकार.
  2. उ किंवा ऊ पूर्ववर्ण असल्यास त्यांचा व्(९) होतो. यांचे २२ प्रकार.
  3. ऋ ॠ पूर्ववर्ण असल्यास त्यांचा र्(१०) होतो. यांचे २२ प्रकार.
  4. ऌ ॡ पूर्ववर्ण असल्यास त्यांचा ल्(११) होतो. यांचे ११ प्रकार.

ए ऐ ओ औ यांच्याबाबतीत सवर्ण हा विचार असत नाही. तरीपण

  • ए आणि ओ हे गुणस्वभावी आहेत.
  • ऐ आणि औ हे वृद्धिस्वभावी आहेत.

ए किंवा ऐ हा पूर्ववर्ण असतांना ए किंवा ऐ उत्तरवर्ण असल्यास संधि वृद्धिरूप म्हणजे ऐ(१२) होतो. याचे ४ प्रकार.

तसेंच ओ किंवा औ पूर्ववर्ण असतांना ओ किंवा औ उत्तरवर्ण असल्यास संधि वृद्धिरूप म्हणजे औ(१३) होतो. याचे देखील ४ प्रकार.

  • ए-पुढे ए-ऐ-खेरीज इतर कुठलाही स्वर आल्यास ए-चा अय्(१४) होतो. याचे ११ प्रकार होतात.
    • ए-पुढे अ हा उत्तरवर्ण आल्यास ‘अ’ चा लोप(१४अ) होतो व तो अवग्रहाने दाखविला जातो.
    • ए-पुढे ए-ऐ-खेरीज इतर कुठलाही स्वर आल्यास ए-चा अ(१४-आ) होतो. याचे ११ प्रकार होतात.
  • ऐ-पुढे ए-ऐ-खेरीज इतर कुठलाही स्वर आल्यास ऐ-चा आय्(१५) होतो. याचे ११ प्रकार होतात.
  • ओ-पुढे ओ-औ-खेरीज इतर कुठलाही स्वर आल्यास ओ-चा अव्(१६) होतो. याचे ११ प्रकार होतात.
  • औ-पुढे ओ-औ-खेरीज इतर कुठलाही स्वर आल्यास औ-चा आव्(१७) होतो. याचे ११ प्रकार होतात.

स्वरसंधींच्या १ ते १७ आणि १४-अ, १४-आ या, शब्दांवरती कंसात आंकडे देऊन दाखवलेल्या नियमांनुसार, प्रकारांची मोजणी अशी होते (१) चे १६, (२, ३, ४, ५, ६, ७) चे प्रत्येकी ८, (८, ९, १०) चे प्रत्येकी २२, (११) चे ११, (१२, १३) चे प्रत्येकी ४, (१४, १४आ, १५, १६, १७) चे प्रत्येकी ११ आणि (१४अ) चा १ सर्व मिळून (१६+४८+६६+११+८+५५+१ =) २०५ उदाहरणे गोळा केली पाहिजेत.

शुभमस्तु !

-o-O-o-