पायऱ्यानिशी संस्कृत (६) -अव्ययानि

आधीच्या पाठात आपण नामांची, सर्वनामांची, विशेषणांची, लिंग-विभक्ती-वचन यानुसार कशी वेगवेगळी  रूपें होतात, तें पाहिलें.  पण असे बरेच शब्द असतात, कि ज्यात लिंग-विभक्ती-वचन यानुसार कांहीही बदल होत नाही. अशा शब्दांना अव्ययें म्हणतात. तीच अव्ययांची व्याख्या एका श्लोकात सांगितली आहे – सदृशं त्रिषु लिङ्गेषु सर्वासु च विभक्तिषु । वचनेषु च सर्वेषु यन्न व्येति तदव्ययम्

  • सदृशम् = सारखें
  • त्रिषु लिङ्गेषु = तीनही लिंगांत
  • सर्वासु च विभक्तिषु = आणि सर्व विभक्तीत
  • वचनेषु च सर्वेषु = आणि सर्व वचनांत
  • यन्न व्येति = यत् न व्येति = जें बदलत नाही
  • तदव्ययम् = तत् अव्ययम् = तें अव्यय.

संस्कृतची गंमत आहे ना, कि व्याकरणाचे नियम, व्याकरणातल्या व्याख्या त्यासुद्धा श्लोकात !

या श्लोकातच दोन/तीन अव्ययें आहेत. सांपडली कां ? ‘च’ (=आणि) दोनदा आणि एक ‘न’ (= नाही).  वाक्यांत अव्ययांचा उपयोग होण्याचे देखील विशिष्ट प्रकार आहेत.

  1. जर-तर (यदितर्हि), जेव्हां-तेव्हां (यदातदा), जिथें-तिथें (यत्रतत्र), जसें-तसें (यथातथा) → गौण आणि प्रधान वाक्यांमधे जसा संबंध असेल, त्यानुसार ही संबंधसूचक अव्यये आपण वापरतो.
    • आणि, वा, अथवा, किंवा (च, वा, अथवा) ही अव्यये देखील दोन किंवा अधिक शब्दांमधे, वाक्यांमधे किंवा वाक्यांशामधे जसा संबंध असेल, त्यानुसार  आपण वापरतो. त्यामुळे ही देखील संबंधसूचक अव्ययेच.
  2. ‘मी आज येतो’ अशा वाक्यात ‘आज’ हे क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषणे चार प्रकारची असतात –
    • कालवाचक – केव्हां (कदा) लगेच (सपदि, अनंतरम्) नंतर (पश्चात्) …
      • आज (अद्य)
      • काल (ह्यः) परवा (परह्यः) तेरवा (प्रपरह्यः)
      • उद्या (श्वः) परवा (परश्वः) तेरवा (प्रपरश्वः)
      • परवा आणि तेरवा हे मराठीत तितके स्पष्ट नाहीत. संस्कृतमधे  प्रपरह्यः-पासून प्रपरश्वः-पर्यंत सात दिवस स्पष्ट सांगता येतात.
    • स्धलवाचक – कोठे (कुत्र, कस्मिन्) इथे (अत्र) दुसरीकडे (अन्यत्र) सगळीकडे (सर्वत्र) आंत (अंतः) बाहेर (बहिः) …
    • रीतिवाचक – कसें (कथम्) असें (एवम्)
    • हेतुवाचक/कारणवाचक – कशासाठी / कशामुळे. (किमर्थम्, कस्मै, केन कारणेन, कस्मात्)
      • स्धलवाचकामधे कस्मिन् हा शब्द सप्तमी विभक्तीत आहे. हेतुवाचक/कारणवाचकामधे कस्मै, केन कारणेन, कस्मात् हे शब्द अनुक्रमे चतुर्थी, तृतीया आणि पंचमी विभक्तीत आहेत. मतलब हा कि बहुशः वाक्यातील तृतीया, चतुर्थी, पंचमी आणि सप्तमी विभक्तीतील शब्द क्रियाविशेषणाचे काम करतात.
  3. अरेरे, अबब ही जशी मराठीत उद्गारवाचक अव्यये आहेत, तशी संस्कृतमधे देखील आहेत. उदा. अहहअहो, बत, उ, उत
  4. अमुक गोष्टीवर भर देण्यासाठी किंवा ठासून सांगण्यासाठी देखील आपण अव्ययें वापरतो, उदा. सुद्धा/देखील (अपि), च (एव) खरोखर (नाम)
    • अपि या अव्ययाबद्दल हें विशेष पण सांगायला हवं, कि वाक्याच्या सुरवातीला अपि घेतल्यास, वाक्य प्रश्नार्थक बनूं शकतं. म्हणजेच अपि-चा प्रश्नार्थक अव्यय म्हणून देखील उपयोग होतो. जसें “तूं ठीक ?” = अपि सुखेन त्वम् ? इथे सुखेन (= सुखाने) हा शब्द देखील क्रियाविशेषणात्मक म्हणून अव्ययासारखा आहे.
  5. ‘जाऊन येतो’ (गत्वा आगच्छामि) अशा वाक्यात, ‘जाणे’ आणि ‘येणे’ अशा दोन क्रिया आहेत – एक आधीची, दुसरी नंतरची. ‘जाणे’ ही क्रिया आधी झाली, हा सगळा अर्थ आपण ‘जाऊन’ (गत्वा) अशा अव्ययात्मक शब्दाने साधला. गीतेतील उक्त्वा तूष्णीम् बभूव ह (२’१०) इथे तीन अव्यये आहेत – (१) उक्त्वा = बोलून (२) तूष्णीम् = गप्प (३)   = उद्गारवाचक. जाऊन (गत्वा) आणि उक्त्वा = बोलून हे दोन्ही शब्द ‘जाणें (गम्)’ बोलणें (वच्) या क्रियावाचक मूळ शब्दापासून बनले. क्रियावाचक मूळ शब्दाना संस्कृतमधे धातु म्हणतात. गत्वा आणि उक्त्वा ही धातूपासून बनलेली धातुसाधित अव्यये.
    • ‘जेवायला जातो’ अशा वाक्यात ‘जेवायला’ (भोक्तुम्) हा शब्द देखील ‘जेवणे’ या क्रियावाचक मूळ शब्दापासून (भुज् या धातूपासून) बनला.
    • असे धातुसाधित अव्ययांचे देखील प्रकार आहेत.
  6. धातुसाधित अव्यये जशी धातूपासून बनतात, तसे अव्ययाचा भाव असणारे अव्ययीभाव शब्द देखील आपण वापरत असतो. जसें आमरण म्हणजे मरेपर्यंत, आसेतुहिमाचल म्हणजे सेतूपासून हिमाचलापर्यंत. पहा –
    • आमरण या शब्दात ‘आ’-चा अर्थ ‘पर्यंत’.
    • आसेतुहिमाचल या शब्दात ‘आ’-चा अर्थ ‘पासून-पर्यंत’.
    • ‘आमरण’ या शब्दाचा अर्थ ‘मरेपर्यंत’ असा अव्ययीभावाचा असला तरी ‘आमरण उपोषण’ (आमरणम् उपोषणम्) अशा वाक्यांशात ‘आमरण’ हें ‘उपोषण’ या शब्दाचे विशेषण ठरतें.
    • आसेतुहिमाचल-चा अर्थ  ‘सेतूपासून हिमाचलापर्यंत’ असा अव्ययीभावाचा असला तरी, ‘आसेतुहिमाचल भारत’ (आसेतुहिमाचलः भारतः) अशा वाक्यांशात ‘आसेतुहिमाचल’ हें ‘भारत’-चें विशेषण ठरतें.
    • कदाचित हा सर्वंकश विचार ध्यानांत घेऊन संस्कृत व्याकरणात ‘अव्ययीभाव‘ असा शब्दांचा विशिष्ट असा प्रकार मानलेला दिसतो.
  7. अथ इति यासारखे शब्द देखील अव्ययेच आहेत, जे स्वतंत्रपणे अर्थपूर्ण आहेत. अथ-चा अर्थ म्हणजे “चला आतां मंगल सुरवात करूं” इतकं संपूर्ण वाक्य ! इति-चा अर्थ “तर, हें असं”.
  8. ‘न’ आणि ‘मा’ ही अव्यये नकारात्मक आहेत. दोन नकारांनी सकारात्मकता येणे हा प्रकार देखील असतो. याचं सुंदर उदाहरण गीतेत आहे. न त्वेवाहं जातु नासम् (२’१२) [न तु एव अहं जातु न आसम् = असं देखील नाहीच ना, कि मी (आधी कधी) नव्हतो.]

अव्ययांच्या वरील वर्गवारीवरून एक असाही विचार म्हणूं शकतो कि, अव्यय हा शब्दांचा विशिष्ट प्रकार किंवा शब्दांची अमुक जात असं न मानता, वाक्यात कोणताही बदल केला तरी, ज्या शब्दांच्या रूपांत बदल होत नाही, ते शब्द अव्यये असतात. या विचाराचा उहापोह करण्यासाठी संस्कृत वाक्यांत येणारे शब्द कसे बनलेले असतात, त्याचा थोडा अधिक अभ्यास व्हायला हवा.

अव्ययांची ही अशी वर्गवारी मांडण्यामागचा एक विचार हा कि, अव्यये तशी खूप आहेत. ५-व्या परिच्छेदात गत्वा, उक्त्वा, भोक्तुम् ही जी धातुसाधित अव्ययांची उदाहरणे दिली, तशी धातुसाधिते संस्कृतमधील सर्वच धातूंपासून बनणार. संस्कृत मध्ये दोनेक हजार धातू आहेत. म्हणजे धातुसाधित अव्ययांचीच मोठी संख्या झाली ना ! संस्कृत वाक्यात अव्यये केव्हां, कशी वापरली जातात याची रूपरेखा मांडायची, इतकाच या पाठाचा उद्देश.

शुभमस्तु !

-o-O-o-

Leave a comment